Saturday, July 27, 2024
Homeनगरब्राम्हणीत कारभारणींसाठी कारभार्‍यांचा आटापिटा; अनेकांची प्रतिष्ठा पणाला

ब्राम्हणीत कारभारणींसाठी कारभार्‍यांचा आटापिटा; अनेकांची प्रतिष्ठा पणाला

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी तालुकास्तरीय राजकीय जोडे बाजूला ठेवून खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.सुभाष पाटील यांना मानणारे कार्यकर्ते आपापल्या सोयीनुसार राजकारण करत असतात.

- Advertisement -

ब्राह्मणीत गावपातळीला आपापल्या सहमतीनुसार विचार करून गावचे राजकारण करत असतात. गावातलं राजकारण संपल्यानंतर तालुका पातळीवरील राजकारणात आपापल्या नेत्यांकडे निवडणुकीसाठी उभे असतात. गावातील राजकारणामध्ये वरिष्ठ नेत्यांचा कुठलाही वापर न करता आपापल्या निवडणुका लढवतात. नुकतेच सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये संस्थेचे मार्गदर्शक पंढरीनाथ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण बानकर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, बाळासाहेब देशमुख, माणिक तारडे, दादासाहेब हापसे, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, जालिंदर हापसे, शिवाजी राजदेव यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती तर त्यांच्या विरोधात बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ मोकाटे, कारखान्याचे माजी संचालक भारत तारडे, विजयराव बानकर, विठ्ठल मोकाटे, डॉ. राजेंद्र बानकर यांनी एकत्र येऊन सोसायटीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले होते.

आता ग्रामपंचायत निवडणुका सुरू झाल्यामुळे पुन्हा कशा युती होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये सध्या तरी बानकर, तांबे, हापसे, तारडे, देशमुख, राजदेव एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ब्राम्हणीच्या सरपंच पदाची जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखिव असल्याने त्यांच्याकडून सरपंच पदासाठी सुवर्णा सुरेश बानकर. वैशाली महेंद्र तांबे, निकिता गणेश तारडे, शीला बाळासाहेब देशमुख, सुरेखा दादासाहेब हापसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसर्‍या तनपुरे गटाच्या मोकाटे, बानकर, तारडे यांच्याकडून कमल रंगनाथ मोकाटे, वैशाली भारत तारडे, डॉ. सीमा राजेंद्र बानकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून तसेच सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्तीचे उपाध्यक्ष म्हणून आप्पा मोकाटे यांच्या पत्नी प्रयागा सूर्यभान मोकाटे व कै. केशवराव हापसे यांच्या धर्मपत्नी निर्मला केशव हापसे या सरपंचपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच बानकर-तांबे व त्यांच्या सहकार्‍यांची युती न झाल्यास अपर्णा प्रसाद बनकर या अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे समजते.

ब्राह्मणी ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय अटीतटीची होणार असून गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून बानकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत असून सध्या सुरेश बानकर यांचे बंधू प्रकाश बानकर हे लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत होते. विविध विकास कामे गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले असल्यामुळे बानकर यांच्या पॅनलला याचा मोठा फायदा होईल तसेच राहुरी बाजार समितीचे माजी संचालक महिंद्रा तांबे यांच्या कुटुंबाचेही गावासाठी मोठे योगदान असल्याने त्यांच्या पत्नी निवडणुकीत उतरल्यास त्यांनाही त्याचा फायदा होईल.

माजी उपसरपंच रंगनाथ मोकाटे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकास कामासाठी स्वखर्चाने अनेकवेळा जनतेच्या कामास प्राधान्य दिले आहे. कारखान्याचे माजी संचालक भारत तारडे यांच्या संपूर्ण कुटुंबाने राजकीय क्षेत्रामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या पदावर काम केल्यामुळे त्यांचा जनसामान्यांत मोठा संबंध आहे. आता नवीनच होतकरू म्हणून डॉ. राजेंद्र बानकर हे ब्राह्मणी सोसायटीचे संचालक असून तेही गावामध्ये विविध विकास कामांत सहभागी असतात. ब्राह्मणी ग्रामपंचायत मध्ये युवकांची मोठी फळी तयार झाली असून काही युवक निवडणुकीच्या बाहेर राहून कोणाला पाठिंबा देणार? याकडे विशेष लक्ष राहणार आहे. सचिन ठुबे यांच्या भूमिकेकडे सुद्धा सर्वांचे लक्ष आहे.

ब्राह्मणी ग्रामपंचायतमध्ये विखे, कर्डिले, तनपुरे गट नेहमीच एकत्र निवडणूक लढवत असतात. त्यांच्या विरोधात दुसरा तनपुरे गट निवडणूक लढवत असतो. परंतु ग्रामपंचायत निवडणूक तनपुरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र लढवावी, यासाठी माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे हे आग्रही असून त्यांना एकत्र आणण्यात कितपत यश येते, याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे. परंतु गाव पातळीवर तनपुरे गटातील कार्यकर्त्यांचे दोन गट असल्यामुळे त्यांचा एक विचार होत नाही. हे घडून आणण्यासाठी आ. तनपुरेंची बैठकही झाल्याचे समजते.16 तारखेनंतर याचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या