पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
शहरातील कसबा पेठ भागात काल, रविवारी सायंकाळी दोन बुरखाधारी महिलांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. मात्र, घरातील महिलांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धाडसामुळे त्यांचा चोरीचा डाव उधळला गेला. नागरिकांच्या मदतीने दोनपैकी एका चोरट्या महिलेला पकडण्यात यश आले असून, दुसरी महिला पळून जाण्यात यशस्वी झाली. महिलांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन बुरखाधारी महिलांनी कसबा पेठ, ब्राह्मण गल्ली येथील रंजना वारुळे यांच्या घरात प्रवेश केला. घरात रंजना वारुळे या उपस्थित असताना, या अज्ञात महिला थेट वरच्या मजल्यावर गेल्या. त्यांच्या संशयास्पद हालचालींवर वारुळे यांचे लक्ष गेले. त्यांनी या महिलांना हटकले असता, चोरट्यांनी गोंधळून थेट घराची कडी लावली आणि वारुळे यांच्यावर झडप घातली.
वारुळे यांनी या झटापटीत अत्यंत धाडसाने चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यांच्या या प्रतिकारामुळे चोरट्या महिलांचा उद्देश हाणून पाडला गेला आणि त्यांनी पळ काढला. वारुळे यांच्या घरात सुरू असलेला गोंधळ जवळच राहणाऱ्या सुरेखा नागेश भोसले यांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्परता दाखवली आणि पळणाऱ्या दोनपैकी एका चोरट्या महिलेला पकडले. मात्र, दुसरी साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली. स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की, या चोरट्या घरात स्प्रे मारून चोरी करत असाव्यात. रंजना वारुळे आणि सुरेखा भोसले यांनी दाखवलेले हे शौर्य सध्या पाथर्डी शहरात कौतुकाचा विषय ठरले आहे.
पोलिसांनी पकडलेल्या महिलेची प्राथमिक चौकशी केली असता, तिचे नाव कोमल रवी जाधव असून, ती पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांकडे चोरीसाठी वापरण्यात येणारे आक्षेपार्ह साहित्य सापडले. त्यांच्यापैकी एका महिलेकडे चाकू होता, तर दुसऱ्या महिलेच्या पिशवीत मिरची पावडर आणि प्लॅस्टिकची बंदूक आढळून आली आहे. प्राथमिक चौकशीनुसार, त्यांचा उद्देश चोरी करणे हाच होता, हे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे चोरट्यांनी घरात घुसून नेमकी किती चोरी केली होती किंवा त्यांची नेमकी योजना काय होती, याचा तपास करणे आवश्यक आहे. पाथर्डी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




