धुळे | प्रतिनिधी
जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे धुळे तालुक्यातील विंचूर शिवारात पुरमेपाडा पाटचारीचे नुकतेच पुर्नजीवनाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे परिसरातील तब्बल २०० विहीरींची पाण्याची पातळी वाढणार असून १२०० एकर शेतीलाही सिंचनाचा फायदा होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टची धुळे तालुक्यात जवाहर सिंचन चळवळ अविरतपणे सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतजमीनीची पाण्याची पातळी वाढून बागयती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळे तालुक्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार व्हावा या हेतूने आ.कुणाल पाटील यांनी जवाहर सिंचन चळवळ सुरु केली.
जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे आतापर्यंत धुळे तालुक्यात १०२ गावांमध्ये तब्बल ४०० पेक्षा अधिक बंधार्यांचे झाले खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच नद्यांचेही उगमापासून तर संगमापर्यंत खोलीकरण करुन पाण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे.
दरम्यान पांझरेवरील बंधार्यांचेही पुर्नजीवन करुन त्यातील पाणी तालुक्यातील शेतीला देण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. तसेच धुळे तालुक्यातील छोटे मोठे तलाव, धरणेही दुरुस्त व खोलीकरण केले आहेत. आज या कामांचा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतांना दिसून येत आहे.
जवाहरची सिंचन चळवळ सतत सुरु ठेवत धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातून पुरमेपाडा धरणाची पाटचारी काढण्यात आली आहे. मात्र सदर पाटचारी नादुरुस्त झाली होती. त्यात गाळ,झाडे झुडपे वाढली होती. त्यामुळे त्यातून शेतकर्यांना पाणी देणे अशक्य झाले होते. सदर पाटचारीच्या दुरुस्तीबाबत शेतकर्यांनी आ.कुणाल पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
त्यामुळे जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टने सदर काम हाती घेतले आणि एकूण पाच कि.मी. असलेल्या या पाटचारीचे पुर्नजीवन केले. त्यामुळे विंचूर परिसरातील सुमारे १२०० एकर शेतीला त्याचा लाभ होणार आहे तर तब्बल २०० विहीरीची पाण्याची पातळी उंचावण्याचा मदत होईल. आ.कुणाल पाटील यांनी या पाटचारीचे पुर्न जीवनाचे काम केल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.