जळगाव | प्रतिनिधी
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या रेटारेटीत आणि वाद्यांच्या कर्कश आवाजाने शिवसेनेच्या शोभा चौधरी, मंगला बारी यांना भोवळ आली. या चेंगराचेंगरीत त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले. मुंबईहून ते गीतांजली एक्सप्रेसने जळगावात आले. त्यांचे स्वागत करण्यासाठी रेल्वेस्थानकावर स्टेशनवर शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गुलाबराव रेल्वे स्थानकातून बाहेर येत असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. दरम्यान, गर्दीमुळे गुलाबराव पाटील स्वत:ही मध्येच अडकले होते.
मात्र, त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे कडे देत जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गर्दी पांगवल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.