करंजी । वार्ताहर
सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील मिरी-तिसगाव रस्त्यावरील पारेवाडी गावाजवळचा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
अतिवृष्टीमुळे रुद्रा नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेला. पुलाचा मोठा भाग तुटल्याने रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे, मोहोज खुर्द, मोहोज बुद्रुक या गावांसह परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे अनेक बंधारे फुटले असून, विजेचे खांब पडले आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे सार्वजनिक आणि वैयक्तिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत सुरू केली जाईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लवकरच दूर होईल अशी अपेक्षा आहे.
या पुलाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती अक्षय कर्डिले यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन-तीन दिवसांत पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची मागणी आहे की, हा पूल तातडीने दुरुस्त करून या रस्त्यावरील वाहतूक लवकरात लवकर सुरू करावी. यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.




