अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नवरात्र उत्सवानिमित्त एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिर परिसरात विविध दुकाने उभारण्यात आले आहेत. येथे लावण्यात आलेल्या टॅटू दुकानाच्या कारणावरून वाद निर्माण होऊन चार जणांनी मिळून दोघां भावांना लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारस गुजरमल बावरीया व त्यांचा भाऊ रमेश बावरीया (दोघे मुळ रा. लालसोट, जि. दोसा, राजस्थान, हल्ली रा. रेणुकामाता मंदिर परिसर, एमआयडीसी) हे दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पारस बावरीया यांनी मंगळवारी (23 सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंसराज बन्सी बावरीया, बच्चु बन्सी बावरीया, मिठालाल बन्सी बावरीया व भरतलाल बन्सी बावरीया (सर्व रा. लालसोट, जि. दोसा, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी व त्याचा भाऊ रमेश बावरीया हे सोमवारी (22 सप्टेंबर) रात्री 9 वाजताच्या सुमारास एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिर परिसरात असताना टॅटूचे दुकान लावण्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करून फिर्यादी व त्याच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, मारहाणीतील जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलीस अंमलदार पितळे अधिक तपास करीत आहेत.




