Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशBudget session 2022 : राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारचं कौतुक, म्हणाले...

Budget session 2022 : राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारचं कौतुक, म्हणाले…

दिल्ली | Delhi

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू झाले आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं.

- Advertisement -

संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना त्यांनी करोना महामारीपासून या काळात राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतकरी, महिलांपासून ते तिहेरी तलाकपर्यंतच्या मुद्द्यांचा त्यांच्या भाषणात समावेश होता. राष्ट्रपतींनी अभिभाषणाची सुरुवात स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून केली.

करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या जागतिक महामारीचे हे तिसरे वर्ष आहे. या काळात भारतातील लोकांची लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अधिक दृढ होत असल्याचे आपण पाहिले आहे. कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात भारताच्या क्षमतेचा पुरावा लसीकरण कार्यक्रमात दिसून आला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत १५० कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याचा विक्रम आम्ही पार केला आहे. आज आपण जगातील सर्वात जास्त लसीचे डोस असलेल्या आघाडीच्या देशांपैकी एक आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले.

तसेच तिहेरी तलाकला कायदेशीर गुन्हा घोषित करून सरकारने समाजाला या वाईट प्रथेपासून मुक्त करण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम महिलांनी केवळ मेहरामसोबत हज करण्याची मर्यादाही हटवण्यात आली. सरकारचे धोरणात्मक निर्णय आणि प्रोत्साहन यामुळे विविध पोलीस दलात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व गरिबांना दर महिन्याला मोफत रेशन देत आहे. याबरोबरच सरकारने जन धन-आधार-मोबाईल म्हणजेच जेएएम ट्रिनिटीला नागरिक सशक्तीकरणासोबत जोडले आहे. याचाही चांगला परिणाम झाला आहे. 44 कोटींहून अधिक गरीब देशवासियांना बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे करोना महामारीच्या काळात करोडो लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्यास मदत झाली, अशी माहिती रामनाथ कोविंद यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या