Friday, May 3, 2024
Homeनगरबीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधा

बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधा

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेवगाव येथील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी सादर केलेल्या 2017 च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे, या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, शेवगावचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनील काकडे, संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदीप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, बबलू तांबोळी, राजू वाकळे, भाऊसाहेब भाग्यवंत, रणजित शेळके, राधेश्याम मुंदडा, ज्ञानदेव सोनवणे, मधुकर वणवे, बबन घुगे, प्रल्हाद कांबळे आदींसह टपरीधारक उपस्थित होते.

- Advertisement -

शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची) ही 1857 रोजी स्थापन करण्यात आलेली असून त्यालगत चारही बाजूने टपरीधारक विविध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या सर्व टपरीधारकांकडून अधिकृतरित्या नगरपरिषदेला कर पावतीचा प्रतिदिन भरणा केला जात आहे. या शाळेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्या काकडे यांनी जिल्हा परिषदेला सादर केला होता. यानंतर तो प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला. 14 जून 2021 रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), जिल्हा परिषद शाळा उर्दू, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र पैठण रोड आदी सर्व ठिकाणच्या जागा 99 वर्षाच्या करारावर देण्याची मागणी अधिकारी व पदाधिकार्‍यांमधून झाली. या निर्णयाने धनदांडग्यांचा फायदा होऊन सर्वसामान्य टपरीधारकांचे नुकसान होणार असल्याने काकडे यांनी या मागणीला विरोध दर्शविला. या प्रस्तावास सर्व टपरी धारकांचा देखील विरोध असून, याबाबत जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या 2017 च्या प्रस्तावाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नसून 99 वर्षांच्या करारावर मंजुरी देणे म्हणजे टपरीधारकांची रोजंदारी बंद करून उपासमारीची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या