शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
दिल्ली येथील साई भक्तांची शिर्डीत चार मजली इमारतीच्या खरेदी व्यवहारात 51 लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 51 लाखांची फसवणूक करणार्या जागा मालकाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डी परिसरात राहणार्या कुमावत यांना त्यांची चार मजली इमारत विक्री करायची आहे अशी माहिती खरेदी-विक्री करणार्या खंडू गोर्डे नावाच्या व्यक्तीला दिली होती. त्याच्या मध्यस्थीने दिल्ली येथील एका साई भक्ताने ही इमारत खरेदी करण्यासाठी एक कोटी अकरा लाख रुपयांत व्यवहार करून इमारत विकत घेण्यासाठी 51 लाख रुपये इसार म्हणून दिले होते.
परंतु खरेदीखत करून देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने दिल्ली येथील साई भक्त मनोज कुमार आणि राजेंद्र कुमार यांनी शिर्डी पोलिसांत कायदेशीर फिर्याद दिली. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी आरोपी विजय छगनराव कुमावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मनोज कुमार आणि राजेंद्र कुमार जैन हे साई भक्त आहेत. त्यांना शिर्डी येथे मिळकत अपेक्षित असल्याने खंडू गोर्डे यांच्या माध्यमातून हा व्यवहार केला गेला. सदरचा व्यवहार एक कोटी अकरा लाख रुपयांत ठरलेला होता. एक जुलै 2024 रोजी नोटरी देखील करण्यात आली होती. त्या पोटी 81 हजार, 95 हजार रुपये ऑनलाइन आणि 75 हजार फोन पेवरून असे दोन लाख 51 हजार रुपये दिले. राहिलेली रक्कम खरेदीखताच्या वेळी दिल्यानंतर घराचा ताबा देण्याचे देखील ठरले होते.
विजय छगनराव कुमावत यांनी वेळोवेळी अनेक कारणे देऊन पैसे दिले नाही तर तुमचा ईसार बुडेल, तसेच नोटरी देखील रद्द होईल, असे सांगितले. त्यामुळे एक जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधी अखेर फोन पे, गुगल पे, बँक अकाउंटमार्फत 51 लाख रुपये दिल्यानंतरही सदर इमारत व जागेची खरेदी करून विजय कुमावत देत नाहीत. याबाबत या व्यवहारात मध्यस्थी असलेले खंडू गोर्डे यांना विचारले असता, त्याने सदरचा इसम हा फसवणूक करणारा आहे, असे मला फोनवर सांगितले. त्यानंतर सदर इमारत व जागेबाबत मी माहिती काढली असता, सदरच्या इमारतीवर विजय कुमावत यांच्या पत्नीच्या नावाने जवळपास 45 लाख रुपये कर्ज असून, त्याबाबत इमारतीवर बोजा असल्याचे समजल्याने वेळोवेळी पैशाची मागणी केली.
खरेदीखत करून देण्यास नकार दिल्याने माझी जवळपास विजय छगनराव कुमावत यांनी 51 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अशी फिर्याद दिल्लीतील मनोज कुमार राजेंद्र कुमार यांनी शिर्डी पोलिसात दिली आहे, त्यामुळे पोलिसांनी 316 (2), 318 (4), 340 (2), 336 (2) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीतील आरोपी विजय छगनराव कुमावत यांनी या अगोदर देखील शिर्डी शहरातील काहींची याच इमारतीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला होता, त्यात काहींना लाखो रुपयांचा फटका बसला होता. ती मंडळी देखील आता विजय कुमावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे करीत आहेत.