जळगाव । प्रतिनिधी
येथील बी.यू.एन.रायसोनी प्राथमिक व माध्यमिक मराठी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘पर्यावरण कॅम्प’ म्हणून जळगाव शहरालगत असलेल्या महा राष्ट्र शासनाच्या ‘लांडोरखोरी वनोद्यान’ला क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत शालेय अभ्यासक्रमाला अनुसरून तेथील पर्यावरणाची प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यास केला.
शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चंद्रशेखर, पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे व सर्व शिक्षक वृंद यांनी हा पर्यावरण कॅम्प काढून विद्यार्थ्यांना पर्यावरणा विषयी क्षेत्रभेटीतून माहिती दिली.
शिक्षण ही स्वयंविकासाची साधना आहे, बी.यू.एन.रायसोनी शाळेचा पाठ्यक्रमा सोबतच शाळाबाह्य शिक्षणावरही भर असतो. लांडोरखोरी वनोद्यान भेटीत त्याठिकाणच्या विविध वृक्ष, पाणी, हवा, प्रदूषण, वनौषधी आदी विषयांची माहिती शिक्षक वृंदांनी करून दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वनोद्यानात फिरून तेथील निसर्ग सृष्टीचा आनंद घेतला. शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी जागृतता निर्माण होण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन, संतुलनाबाबत मार्गदर्शन केले.
जैवविविधतेने नटलेल्या परिसराचा आनंद
विद्यार्थ्यांनी या उद्यानात ससे, मुंगूस, उद्यान सरडा, शामेलीयन, माकड आदी प्राण्यांचे अस्तित्व पाहीले. तर देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजातीही बघीतल्या व निरीक्षण मनोऱ्यावरून निसर्गाची पाहणी केली.
औषधांच्या झाडांची घेतली माहिती
उद्यानात अनेक औषधांचे गुणधर्म असलेल्या औषधांची झाडे लावलेली आहेत. यात खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, केंकळ यासारखे नवस्तपती झाडे असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली व त्यांचे औषधी गुणधर्माची माहिती मिळविली.
दहशतवाद विषयावर भाषण
आजच्या घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता? असा प्रश्न जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकात ह्या प्रश्नांचे संपूर्ण जगात लहानमोठ्या देशातील भल्याभल्यांच्या रात्रीची झोप उडवून टशकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
मनोरंजन – पर्यावरण कॅम्प दरम्यान विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत मनोरंजनात्मक खेळ खेळले. गाण्यांच्या भेंड्या आदींचा मनमुराद आनंद घेतला.
या क्षेत्रभेटीचा प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.