Monday, October 7, 2024
Homeक्राईमशेअर मार्केटमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी ‘तो’ घरफोड्या करायचा; टप्प्यात येताच गजाआड

शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी ‘तो’ घरफोड्या करायचा; टप्प्यात येताच गजाआड

पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी उच्चशिक्षित तरुण भरदिवसा बंद फ्लॅट फोडून चोर्‍या करत असल्याचा प्रकार कोतवाली पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाला आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याने अहिल्यानगर शहरासह पुणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर जिल्ह्यात चोर्‍या केल्या असल्याचे समोर आले आहे. प्रज्वल गणेश वानखेडे (रा. टी. व्ही. सेंटर, हडको, श्रीकृष्णनगर जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, केडगाव उपनगरात केलेल्या घरफोड्यांतील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा पाच लाखांचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

11 एप्रिल 2023 रोजी केडगाव उपनगरातील मोतीनगरमध्ये बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड भरदिवसा चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला असता. प्रज्वल गणेश वानखेडे याचे नाव निष्पन्न झाले. मात्र तो उच्च शिक्षित असल्याने फोनचा वापर तांत्रिकरित्या करत होता. आपले वास्तव्याचे ठिकाण पुणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर असे बदलत होता. त्यामुळे त्याला अटक करणे पोलिसांसमोर आव्हान होते. 2 जानेवारी 2024 रोजी केडगाव उपनगरातील साई गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हाचा तपास पोलीस करत असताना तो गुन्हा देखील प्रज्वल वानखेडे याने केला असल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे कोतवाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक प्रज्वलच्या मागावर होते. तो छत्रपती संभाजीनगर येथील चितेगाव एमआयडीसीमध्ये आला असल्याची माहिती पोलिसांना 4 ऑक्टोबर रोजी मिळाली होती. गुन्हे शोध पथकाने तात्काळ चितेगाव एमआयडीसी गाठून प्रज्वलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदरचे गुन्हे शेअर मार्केटमध्ये पैसे हरल्याने, कर्जबाजारी झाल्याने कर्ज मिटविण्यासाठी केले असल्याची कबुली दिली. तसेच त्याने पुणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर येथे दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, विकास काळे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, सलीम शेख, संदीप पितळे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, मोहन भेटे, नकुल टिपरे, विजय काळे, अभय कदम, अमोल गाढे, सतीश शिंदे, अतुल काजळे, राम हंडाळ, संदीप थोरात, वर्षा पंडित, सोनल भागवत, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या