अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी येथील बालिकाश्रम रस्त्यावरील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यापूर्वी एकाला अटक केली होती तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.
ही घटना 11 मे रोजी घडली होती. निलम गणेश क्षीरसागर या महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान समीर बालम शेख (वय 28, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून रतन रविशंकर अग्रवाल (रा. वरूर, ता. शेवगाव) याचे नाव समोर आले.
हा संशयित आरोपी गुन्हा केल्यानंतर पसार झाला होता. 20 मे रोजी पथकाला माहिती मिळाली की, रतन अग्रवाल माळीवाडा एसटी स्टॅण्ड येथे येणार आहे. पथकाने तत्काळ तेथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 66 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीत संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.