अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घरफोडी प्रकरणांचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत 8 लाख 76 हजार रूपये किमतीचे 92 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईने पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयित आरोपींकडून चोरीचे सर्व दागिने ताब्यात घेतले असून, दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.
18 जुलै रोजी सुनंदा नरहरी ढाकणे (वय 45, रा. पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दाखल केली होती की, 17 जुलै रोजी संध्याकाळी 6.15 ते 8.45 दरम्यान त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी कोणीतरी उघडून घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील 68 हजार रूपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली. यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. बातमीदारांव्दारे मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप (वय 24, रा. सिध्दार्थनगर) याच्याकडे संशय गेल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पुढील तपासात त्याने चोरीचे दागिने आपला मित्र दुर्गेश चंद्रकांत चितांमणी (वय 21, रा. नेप्ती नाका, अमरधामच्या पाठीमागे) याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले. दुर्गेशला अटक करून त्याच्याकडून 70 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, सहा ग्रॅम वजनाचे दोन कानातील टॉप्स, 4 ग्रॅम वजनाच्या चार लहान अंगठ्या, 4.5 ग्रॅम वजनाचे दोन झुबे, 3.5 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, 3.5 ग्रॅम वजनाचे डोरले व चांदीची चैन असा एकूण आठ लाख 76 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तपासात दोन गुन्हे उघड झाले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार योगेश चव्हाण, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सतिष भवर, भागवत बांगर, राहुल गुंड्डू यांचा समावेश होता. या गुन्ह्यांचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार कविता गडाख या करीत आहेत.




