Friday, November 22, 2024
Homeक्राईमव्यावसायिक कुटुंब पर्यटनासाठी गेले, चोरट्यांनी 10 तोळे चोरून नेले

व्यावसायिक कुटुंब पर्यटनासाठी गेले, चोरट्यांनी 10 तोळे चोरून नेले

माणिकनगरमधील घटना || कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरासह उपनगरात चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. केडगाव उपनगरात कपड्याचे दुकान फोडून पावणे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच माणिकनगर येथील व्यावसायिक कुटुंब पर्यटनासाठी गेले असता त्यांचे घर फोडून साडेदहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोकड असा तीन लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी व्यावसायिक निखील संजय मुनोत (वय 34 रा. पत्रकार वसाहत, माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटल जवळ, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निखील मुनोत हे कुटुंबासह 2 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता घर बंद करून राजस्थान येथे देवदर्शन व पर्यटनासाठी गेले होते. जाताना त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवून लॉकर लॉक केले होते. दरम्यान, ते शनिवारी (9 नोव्हेंबर) सकाळी सव्वा सातच्या सुमारास घरी आले. त्यांनी कुलूप उघडून आत प्रवेश केला असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला व दरवाजा उघडा दिसल्याने घरात चोरी झाली असल्याची त्यांची खात्री झाली. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांना दिसून आली नाही. त्यांनी घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली.

घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे व अंमलदार यांच्यासह फिंगरफ्रिंट व डॉगस्कॉड पथक यांनी भेट दिली. मुनोत यांच्या घरातून 65 हजारांची रोकड, सहा तोळ्याच्या सहा बांगड्या, दीड तोळ्याच्या आठ अंगठ्या, दीड तोळ्यांचे मनीमंगळसूत्र, दीड तोळ्यांचा सोन्याचा हार असा एकूण तीन लाख 80 हजारांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुगडे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या