संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यात घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून 250 ग्रॅम सोन्यासह 24 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अहिल्यानगर, सातारा, नाशिक, पुणे येथील 16 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यातही यश मिळाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की जून महिन्यात शालिनी बाळशीराम शेळके (वय 50, रा.बोटा, ता.संगमनेर) या त्यांचे राहते घर बंद करून बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत घारगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे तपास करत आहे.
दरम्यान, शनिवारी (दि.5) वरील गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले (वय 28, रा.बेलगाव, ता.कर्जत) याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपींचा शोध घेऊन मिलिंद भोसले, सुनीता उर्फ सुंठी देविदास काळे (वय 35, रा.नारायण आष्टा, ता.आष्टी, जि.बीड) व एक विधीसंघर्षित बालक (वय 17, रा.बेलगाव, ता.कर्जत) यांना ताब्यात घेतले. यातील मिलिंदकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदरचा गुन्हा वरील साथीदारांसह शुभम उर्फ बंटी पप्पू काळे (रा.एम.आय.डी.सी., अहिल्यानगर), सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले व कुर्हा ईश्वर भोसले (तिघेही रा.बेलगाव, ता.कर्जत) फरार असून त्यांनी दोन मोटारसायकलवरून बंद घराची पाहणी करुन घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली.
या पथकाने ताब्यातील आरोपी मिलिंद भोसले यास अधिक विश्वासात घेऊन आणखी कोठे गुन्हे केले आहेत याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या वरील साथीदारांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव, श्रीरामपूर, संगमनेर, पुणे, सातारा व नाशिक जिल्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितल्यावरून 16 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यात घारगावचे 5, संगमनेर तालुका 3, शहर 1, श्रीरामपूर तालुका 2, लोणी 1, लोणंद 1 आळेफाटा 1, फलटण ग्रामीण 1 व वावी 1 या गुन्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता बहीण सुनीता उर्फ सुंठी देविदास काळे व पत्नी कोमल मिलिंद भोसले यांच्या मार्फत सोनारास विकला असल्याचे व काही मुद्देमाल नातेवाईकाच्या घरामागे लपवून ठेवला असल्याची माहिती दिली. पथकाने सोनाराकडून 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आरोपीने दिलेला 19 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्याच्या वेळी वापरलेला गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे, मोटारसायकल व लोखंडी कटावणी असा एकूण 24 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुख्य आरोपी मिलिंद भोसले हा सराईत असून, त्याच्यावर 18 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासाकामी त्यास घारगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे.




