अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकार्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 27 तोळ्याचे सोन्याचे व 40 ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि 22 हजाराची रोख रक्कम असा एकूण 9 लाख 39 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग नागु धोत्रे (वय 67, रा. नक्षत्र मंगल कार्यालयापाठीमागे, बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. धोत्रे हे सैन्यदलातून सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. धोत्रे 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, लक्ष्मी हार, सोन्याची चेन, ब्रेसलेट, अंगठ्या, मंगळसूत्र, राणीहार, चांदीचे पैंजण व जोडवी असे सुमारे 27 तोळ्याचे दागिने, 40 ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि लोखंडी कपाटात ठेवलेली 22 हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण 9 लाख 39 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
प्रवास संपवून 2 नोव्हेंबर रोजी परत आल्यानंतर धोत्रे यांना हा सर्व प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. धोत्रे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या करत आहेत.




