अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुकुंदनगर भागातील हिना पार्क परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूवारी (20 नोव्हेंबर) रात्री 11:30 ते शुक्रवारी (21 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसरत जहाँ महमंद आझम बागवान (वय 40, रा. पारशा खुंट, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे वडिल मुकुंदनगर भागातील हिना पार्क येथे राहतात.
गुरूवारी रात्री 11:30 वाजताच्या नंतर चोरट्यांनी फिर्यादीच्या वडिलांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील जुने व वापरते सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. चोरट्यांनी पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्याचे सोन्याचे कंगण, एक तोळ्याची सोन्याची अंगठी, दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण व सात ग्रॅम कानातील रिंगा असा एकूण 3 लाख 21 हजार रूपयांचा सुमारे 11 तोळ्याचा ऐवज चोरला आहे.
सदरची घटना दुसर्या दिवशी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे अधिक तपास करीत आहेत.




