अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तारकपुर येथील ख्रिश्चन कॉलनीमधील बी-07 या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून सुमारे साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने, 65 हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (28 जुलै) दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान ते मंगळवारी (29 जुलै) सकाळी 9.15 वाजेच्या दरम्यान घडली असून, बुधवारी (30 जुलै) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गौरव अल्फ्रेड गमरे (वय 33, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपुर, हल्ली रा. धानोरी रस्ता, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. गौरव हे सध्या पुण्यात खराडी येथे नोकरी करत असून, अधूनमधून आपल्या कुटुंबासह अहिल्यानगर येथील घरी येत असतात. 25 जुलै रोजी ते कुटुंबासह घरी आले होते. मात्र, 28 जुलै रोजी पुण्यात कामानिमित्त जाण्यापूर्वी त्यांनी दुपारी 3.30 वाजता घर व्यवस्थित कुलूप लावून निघून गेले. 29 जुलै रोजी सकाळी 9.15 वाजता त्यांचे चुलते पीटर जेम्स गमरे यांचा त्यांना फोन आला. पीटर हे घरी गेले असता तीन दरवाज्यांच्या कड्या तुटलेल्या व कपाटे उघडी दिसून आली. त्यांनी लगेच गौरव यांना घरफोडून चोरी झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच गौरव पुण्यातून तातडीने अहिल्यानगरला परतले.
दरम्यान, घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी केली. त्यानंतर घरात पाहणी केली असता कपाटातील लॉकर फोडलेले असून, त्यामधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरी गेलेला मुद्देमाल
65 हजार रूपयांची रोख रक्कम, 20 ग्रॅमची सोन्याची चैन, 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 35 ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 10 ग्रॅम सोन्याचे कानातील बटन व 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे चार पैंजण असा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिसांनी या ऐवजाची एकूण किंमत 1 लाख 50 हजार 500 रूपये दाखविली आहे. दरम्यान, या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.




