अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पत्रिका पाहण्याचे काम करत असलेल्या वृध्द व्यक्तीचे घर फोडून हॉलमधील देवघरात असलेले एक किलो 210 ग्रॅमचे चांदीचे विविध दागिने चोरून नेले. सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील किर्लोस्कर कॉलनीत रविवारी (24 नोव्हेंबर) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी (25 नोव्हेंबर) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विवेक मधुकर रणभोर (वय 68) यांनी फिर्याद दिली आहे. ते किर्लोस्कर कॉलनीतील अमेय हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात व पत्रिका पाहण्याचे काम करतात. घरातील हॉलमध्ये श्री स्वामी समर्थ व श्री दत्त यांचे मंदिर आहे. त्या मंदिरातील देवांच्या अंगावर चांदीचा हार, माणिक खड्यासह अंगठी व टोप, चांदीची पादुका व चिलम होती.
रविवारी रात्री नऊ वाजता फिर्यादी घराच्या खालच्या हॉलमधील श्री स्वामी समर्थ व श्री दत्त मंदिर येथे पत्रिका पाहण्याचे काम करून हॉलला बाहेरून व्यवस्थित कडीकुलूप लावून वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपण्याकरीता गेले होते. दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी ते उठले असता त्यांना रूमचा दरवाजा बाहेरून ओढणीच्या सहाय्याने बांधून बंद केलेला आढळून आला. फिर्यादी घरातील मंदिरात ठेवलेल्या चांदीच्या दागिन्यांची पाहणी केली असता त्यांना 50 ग्रॅमचा एक चांदीचा हार, 50 ग्रॅमची माणिक खड्यासह असलेली अंगठी, 60 ग्रॅमचे दोन टोप, एक किलोच्या दोन पादुका व 50 ग्रॅमच्या चांदीच्या चिलम व सिगारेट असा सुमारे एक किलो 210 ग्रॅम चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. सीसीटीव्ही देखील खालच्या बाजूला फिरवलेले दिसून आले. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार संजिवनी नेटके करत आहेत.