अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील वाकोडी रस्त्यावरील डॉक्टर कॉलनी परिसरात दसर्याच्या दिवशी मोठी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 14 तोळ्यांच्या दागिन्यांसह 6 लाख 90 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी राहुल सुनील ससाणे (वय 31, रा. वाकोडी रस्ता, डॉक्टर कॉलनी, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (3 ऑक्टोबर) फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी ससाणे हे आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास असून, गुरूवारी (2 ऑक्टोबर) सायंकाळी सर्व कुटुंबीय रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी मार्केट यार्ड, महात्मा फुले चौक येथे गेले होते. रात्री 8.15 ते 10 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराचे लोखंडी सेफ्टी डोअर व मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी व लोखंडी कपाट उचकून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल असा एकूण 6 लाख 90 हजार 800 रूपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरलेल्या गेलेल्या ऐवजामध्ये 4 तोळ्याचे 2 सोन्याचे राणी हार, 18 ग्रॅमचे 3 जोड कानातले वेल, 3 तोळ्याचे 3 झुमके, 15 ग्रॅमच्या 13 बाळ्या, 8 ग्रॅमच्या 8 अंगठ्या, 9 ग्रॅमचे बदाम, 5 ग्रॅमच्या 4 नथ, 2 भाराचे चांदीचे जोडवे, 2 भाराचे चांदीचे कडे, 2 ग्रॅमचे 35 सोन्याचे मणी, मोबाईल यांचा समावेश आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दसर्याच्या दिवशी सर्व कुटुंबीय रावण दहन पाहण्यासाठी बाहेर पडले असताना घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.




