अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील पुणे बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील 37 हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला दत्तराज रायमोकर (वय 37, रा. बागरोजा हाडको, दिल्ली गेट) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी पुणे बस स्थानक, स्वस्तिक चौक येथे गेल्या होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीतून जात असताना अज्ञात चोरट्याने शिताफीने महिलेच्या पर्सची चेन उघडली. पर्समध्ये ठेवलेली एकूण 37 हजार रूपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. काही वेळाने रेणुका ज्वेलर्स या दुकानात गेल्यावर महिलेला आपली पर्स उघडलेली दिसली. त्यांनी तपासणी केली असता त्यातील सर्व रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने बस स्थानक परिसरात धाव घेत शोध घेतला, मात्र चोरटा मिळून आला नाही. अखेर याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. पोलीस अंमलदार कवाष्टे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, बस स्थानक परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी बस स्थानकावर गस्त वाढवावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.




