नाशिक | प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बसमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच बसस्थानकांसह आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षेचे ऑडिट सुरू झाले आहे. मात्र तत्पूर्वीच नाशिकमधील सहाही बसस्थानकांसह सिटीलिंकचे बसथांबे रात्री सामान्यांसह महिलांसाठी पूर्णतः सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. सर्वच बसस्थाकांसह थांब्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेरे, स्थानकात व आजूबाजूला मद्यपी, गर्दुल्यांसह टवाळखोरांचा वावर आणि ओल्या पार्टीचे ठिकाण असल्याने ही ठिकाणे असुरक्षित आहेत. स्वारगेटच्या घटनेनंतर नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी आता बसस्थानकांसह आजूबाजूला दुपारी व रात्रीची गस्त वाढवली असल्याचे समजते.
शहरातील बहुतांश बसस्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखभाल-दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यातच बसस्थानकांमध्ये तैनात सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात असल्याने प्रवाशांसह विशेषतः महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सुटलेला नाही. अनेक बसस्थानकांत भरदिवसा गर्दीचा फायदा घेत दागिने व पैसे चोरीच्या घटना वाढतच आहेत. स्वारगेटला घडलेल्या घटनेनंतर आता पुढील काही दिवस बसस्थानकांतील चोरीमारी व प्रवाशांचे दागिने व पैसे लंपास करण्याच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. तरीही आज सर्वच बसस्थानकांत व बाहेर भुरट्या चोऱ्यांसह महिलावर्गाच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत. बदनामीच्या भीतीने व धमकीमुळे बाहेरगाव व परदेशातून आलेल्या महिला, तरुणी पोलिसांत तक्रार करत नसल्याने विनयभंग, किरकोळ हाणामारी व छेडछाडीचे प्रकार सुरूच आहेत, हे उघड आहे. टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने बसस्थानके असुरक्षित झाली असून एसटी महामंडळासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांसह टवाळखोरांचे फावत चालले आहे.
दरम्यान, अनेक बसस्थानक परिसरात नियमित गस्त होण्यासाठी एसटी प्रशासनाकडून पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र एसटीच्या या मागणीकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे समजते. शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सहा बसस्थानके आहेत. त्यापैकी सातपूर वगळता मुंबईनाका (महामार्ग), ठक्कर बाजार, जुने सीबीएस, निमाणी, नाशिकरोड आदी बसस्थानकांतून कमी-जास्त पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. या बसस्थानकांत प्रवाशांची रोजच वर्दळ असते. या बसस्थानकांची सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यातून बसस्थानकांतील सर्व हालचालींवर नजर ठेवण्याचे नियोजन होते. मात्र ठक्कर बाजार वगळता इतर काही बसस्थानकांमधील कॅमेरेच बंद आहेत. ते सुरू होण्याची अपेक्षा आहे. निमाणी व आडगाव नाका येथून जाता-येताना जीव मुठीत धरूनच प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे.
एजंट आणि वाहतूकदारांचा विळखा
महामंडळाच्या कोणत्याही बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांना २०० मीटर अंतरात प्रतिबंध आहे. तरी हे नियम अडगळीत टाकून सर्वच बसस्थानकांमध्ये खासगी वाहतूकदार व एजंटांची मुजोरी वाढली आहे. थेट एसटीचे प्रवासी पळवले जात असून नेमलेल्या काही सुरक्षारक्षकांना कथित वाहतूकदार, काही रिक्षाचालक धमकावत आहेत. खासगी वाहतूकदारांसह एजंट्सचा विळखा पडल्याने सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांसह एसटीच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यापर्यंत खासगी वाहतूकदारांची मुजोरी वाढली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरुपी अंमलदार नियुक्त करण्याची अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
फेरीवाल्यांचा जाच, रिक्षांत पार्ट्या
अनेक बसस्थानकांत व बाहेर काही रिक्षाचालक, आंबटशौकीन आणि क्वचितप्रसंगी काही बसचालकही गाडीत व रिक्षांतच मद्य पार्ट्या रंगवत असल्याचे दिसून आले आहे. टवाळखोर, काही फेरीवाले, तृतीयपंथी तसेच समलिंगी व्यक्ती नशा करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांशी नाहक वाद घालत असून त्यांची छेड काढत असल्याचे निमाणी, मुंबईनाका, नवीन मेळा स्थानक व ठक्कर बाजार बसस्थानकाजवळून फेरफटका मारताना दिसून येते. तर रात्रीचा प्रवास करून शहरात परतणाऱ्या प्रवासी, कुटुंबे, तरुणींना संशयित रिक्षाचालक, मद्यपींच्या लेट नाईट धिंगाण्यातून कशीबशी सुटका करून घ्यावी लागत आहे. अनेक बसस्थानकांबाहेर मद्य व बिअरच्या बाटल्यांचा खच दिसून येतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा