Thursday, June 13, 2024
Homeनगरकापूस खरेदीतून 34 लाखांची फसवणूक करणारा जेरबंद

कापूस खरेदीतून 34 लाखांची फसवणूक करणारा जेरबंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

चौतीस लाख रुपयांचा कापूस खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यापार्‍यास पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंबादास उर्फ अमोल किसन वाघ (32, (रा. शहर टाकळी ता.शेवगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील गहिनीनाथ एकनाथ वांढेकर यांचे तिसगावच्या उप कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी आरोपी वाघ याने वांढेकर यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या दराने 1 कोटी 12 लाख 5 हजार 860 रुपयांचा कापूस खरेदी केला.

सुरुवातीला कापूस खरेदी केलेले 77 लाख 87 हजार 232 रुपये आरटीजीएसद्वारे वांढेकर यांच्या बँक खात्यावर जमा केले. परंतु कापूस विक्रीची राहिलेली 34 लाख 48 हजार 628 रुपये रककम दिली नाही. त्याने दिलेले दोन धनादेश वांढेकर यांनी बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले. त्यानंतर वांढेकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात 21 ऑगस्ट रोजी वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिनाथ बडे, प्रल्हाद पालवे, अभय लबडे यांनी आरोपी वाघ याचा शोध घेऊन त्याला शनिवारी शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथून अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिनाथ बडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या