नाशिकरोड । दिगंबर शहाणे Nashikroad
बिटको चौक ( Bytco Chowk ) तसेच मुक्तिधाम ( Muktidham ) परिसरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नाशिक दर्शनासाठी येणार्या भाविकांची वाहने, स्थानिकांची वाहने व वाढलेल्या अतिक्रमणामुळे हा प्रश्न सुटणे अवघड झाले आहे. बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको ते देवळाली कॅम्प, गायकवाड मळा या परिसरातील रस्त्यालगतचे फूटपाथ रस्त्यापेक्षा जास्त उंचीवर असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
इमारतीच्या मार्जिन स्पेसमध्ये अनधिकृत व्यवसाय थाटण्यात आले आहेत. चारचाकी वाहने जाण्याएवढी जागा ठेवल्यास वाहन सुरक्षित उभे करता येतील व पार्किंग समस्येवर काही प्रमाणात सोय होईल. याबाबत संबंधित यंत्रणेने योग्य उपाय करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मुक्तीधाम हे नाशिकचेच नव्हे तर परराज्यातील भाविकांचे आकर्षण व श्रध्देचे ठिकाण आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत भाविक आणि स्थानिक नागरिक येथे येत असतात. समोरच सोमाणी गार्डन तसेच दुकाने असल्याने कायम गर्दी असते. या नागरिक व भाविकांची वाहने पार्किंगसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे ते रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. मुक्तीधाम परिसरात वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी सुविधा नाही. हॉस्पिटल्स, हॉटेल्स, दुकानदार यांची व त्यांच्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. हॉस्पिटल्सने पार्किंगची सोय केलेली नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात असा नागरिकांचा आरोप आहे. जगताप मळा रोडवरील हॉस्पिटल्स आणि व्यावसायिकांमुळेही वाहतुकीची कोंडी होते.
मुक्तीधाम परिसरात वाहतूक कोंडी होण्यास वाढती अतिक्रमणेही कारणीभूत आहेत. सोमानी गार्डनरोडवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. नागरिकांनी तक्रार केल्यावर वर्षातून एकदा अतिक्रमण हटविले जाते. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती असते. बिटको चौकात रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहतात. सिग्नल लागल्यावर वाहनांची रांग लागते.
फुटपाथवरही खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा ताबा असतो. रात्री दूधविक्रेते ठाण मांडतात. दुर्गा गार्डन शेजारील फुटपाथवर भटक्यांचे संसार आहेत. त्यामुळे पादचार्यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. मुक्तीधामकडून वॉस्को चौकाकडे जाणार्या मार्गावर, विशेषतः मशिद परिसरातही वाहनांची कोंडी होते. जगताप मळा रस्त्यावरही वाहने चालवणे अवघड झाले आहे.
वाहतूक पोलीस नेमावा
मुक्तीधाम परिसरात वाहनचालक चुकीच्या मार्गाने चालतात. रिक्षा व अऩ्य वाहने चुकीच्या पध्दतीने पार्क केली जातात. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. मुक्तीधाम परिसरात ठराविक मार्गांवर एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवावा, महापालिकेने नियमित अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.
साहेबराव खर्जुल
अतिक्रमण हटवावे
रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे नाशिकरोड परिसरात बेशिस्त पार्किंग झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मुक्तिधाम परिसर, बिटको चौक परिसर या प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. परंतु त्याकडे मनपा अधिकारी दुर्लक्ष करीत आहे सदरचे अतिक्रमण हटल्यास पार्किंग सुरळीत होऊ शकते
अजित गायकवाड