अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील हातमपुरा भागात वस्तू संग्रहालयासमोर सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी कॉम्प्युटर संच, मोबाईल आणि रोख रकमेसह 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
हातमपुरा येथील पंगुडवाल इमारतीत कॅपिटल लॉटरीच्या नावाखाली 1 ते 12 अंकांवर पैसे लावून हार-जितीचा जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुपारी 4:30 वाजता अचानक छापा टाकला.
या कारवाईत शिवम गायकवाड (वय 27, रा. धरती चौक), अय्याज शेख (वय 44, रा. मुकुंदनगर) आणि धनराज चिपोले (वय 46, रा. हमालवाडा) या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 मॉनिटर, 3 सीपीयूसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्कॅनर आणि 9 हजार 810 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस अंमलदार संभाजी कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




