संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहराजवळ असलेल्या खांडगाव फाटा येथे शनिवारी (दि.15) दुपारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणारी कार पकडली. सदर रक्कम एका मोठ्या ठेकेदाराची असल्याचे समजते. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार (क्रमांक एमएच.25, एएस.8851) ही धाराशिव येथून रक्कम घेऊन पुण्याकडून संगमनेरच्या दिशेने येत होती.
कारमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या स्थायी सर्वेक्षण पथकाला गोपनीयरीत्या मिळाली होती. यानंतर पथकाने खांडगाव फाट्यावर सापळा रचून ही कार अडवली. तपासणीमध्ये एक कोटी रुपये रोख रक्कम आढळून आली. प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम एका मोठ्या ठेकेदाराची असल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच शहराचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भरारी पथकासोबत मिळून पंचनामा करून संबंधित रक्कम आणि कार ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.




