नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन्ही पक्ष मात्र सत्तेत एकत्र आले असून शहराच्या १७ व्या महापौर पदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे.
नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिमगौरी आडके यांची महापौर म्हणून निवड केली तर उपमहापौर म्हणून विलास शिंदेंची निवड केल्याचे जाहीर केले.
Nashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी विलास शिंदेंची निवड
कोण आहे हिमगौरी आडके?
हिमगौरी आडके या राजकिय घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या महापौर आहे. सन 1997-98 मध्ये बाळासाहेब आहेर स्थायी समितीचे सभापती होते. वडिलानंतर त्या सभापती पदी विराजमान झाल्या. सन २००२ मध्ये त्यांच्या मातोश्री प्रा. शोभना आहेर या उपमहापौर राहिल्या आहे. तर सध्या चांदवड विधान सभा मतदार संघातून विद्यमान भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर हे त्यांचे चुलत बंधू आहे. आहेर कुटुंब हे सुरुवातीपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहे. हिमगौरी आडके यांनी सन २०१७ मध्ये महापालिकेच्या पहिल्या महिला स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. विशेष म्हणजे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल.
कोण आहे उपमहापौर विलास शिंदे?
सातपूर प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले विलास शिंदे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत नगरसेवक पदाची सलग तिसरी टर्म पूर्ण केली आहे. सातपूर परिसरातील विविध विकासकामांमुळे आणि नागरिकांशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे त्यांनी प्रभागात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विलास शिंदे यांनी यापूर्वी सातपूर प्रभाग सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली असून महापालिकेत शिवसेना पक्षाचे गटनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वकौशल्यामुळे प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे नागरिकांचे मत आहे. मागील पंचवार्षिक कार्यकाळात सातपूर प्रभागातील चारही नगरसेवक शिवसेनेचे होते. त्यांनी गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात एकमेव नगरसेवक म्हणून विलास शिंदे हे विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जनाधाराची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.





