जायखेडा । वार्ताहर Jaykheda
नाशिक-पिंपळनेर बसमधून प्रवास करताना सहप्रवाशांची 22 हजारांची रोकड तसेच अडीच लाखांचे दागिने असा दोन लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणार्या दोघा अनोळखी महिलांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुरेश रघुनाथ बागुल (75, रा. मुल्हेर) या प्रवाशाने जायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागुल हे नाशिक-पिंपळनेर या एसटी बसने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांच्या शेजारी बसलेल्या दोघा अनोळखी महिलांनी बागुल यांची नजर चुकवून त्यांच्या बॅगेतून 22 हजार रुपयांची रोकड तसेच अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा दोन लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
बागुल हे आपल्या गावी बसमधून उतरल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जायखेडा पोलिसांनी दोघा अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पो.हवा. भगरे तपास करत आहेत.