अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्या श्रीरामपूर येथील टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एक वर्षा करीता हद्दपार केले आहे. घार्गे यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्या सलग चौथ्या टोळीवर कारवाई करत कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचा संदेश दिला आहे.
टोळी प्रमुख अहमदनुर अब्दुलगणी कुरेशी (वय 37, रा. सुभेदारवस्ती, वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) आणि सदस्य एजाज कादर कुरेशी (वय 31, रा. कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांनी श्रीरामपूर शहरात संघटित गुन्हेगारी टोळी उभारली होती. राज्यात बंदी असलेल्या गोवंशीय जनावरांचे मांस अवैधरित्या विकून त्यांनी आर्थिक फायदा मिळवला, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांच्या टोळीची गुन्हेगारी वृत्ती इतकी वाढली की, सामान्य नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्यासही घाबरत होते.
पोलिसांनी याआधीही त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल केले, मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. परिणामी, भविष्यात गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता ओळखून, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावावर उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांनी सखोल चौकशी करून शिफारस केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सर्व अहवाल तपासून दोन्ही आरोपींना जिल्हा हद्दीतून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश निर्गमित केले.
गुन्हेगारीबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण
अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यभार स्वीकारल्यानंतर पाच महिन्यात घार्गे यांनी चार टोळ्या हद्दपार केल्या आहेत. घार्गे यांनी स्पष्ट केले की, अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणार्यांविरूध्द ‘शून्य सहनशीलतेचे धोरण’ राबवले जात आहे. शरीराविरूध्द, मालमत्तेविरूध्द, गोवंशीय कायद्यांतर्गत आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे करणार्या टोळ्यांचा पूर्ण बिमोड करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, सध्या इतर अशा टोळ्यांची माहिती संकलित केली जात असून लवकरच आणखी हद्दपारीच्या कारवाया होणार आहेत.




