Monday, May 27, 2024
Homeनगरदिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रात बनावटगिरी करणारा गजाआड

दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रात बनावटगिरी करणारा गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणार्‍या टोळीतील एकाला कोतवाली पोलिसांनी अटक केली. सुनील खंडू पवार (रा. सुरेगाव ता. कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांनी दिली.

- Advertisement -

चौघांनी दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले होते. याच प्रमाणपत्राच्या आधारे एसटी बसमध्ये प्रवास भाड्याचे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची ही बनावटगिरी उघड झाली होती. समाज कल्याणचे सहायक सल्लागार दिनकर भाऊराव नाठे (वय 42 रा. अंबिकानगर केडगाव) यांनी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

यातील आरोपी सुनील पवार याला कोतवाली पोलिसांनी कोपरगाव येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इनामदार, पठाण यांनी ही कामगिरी केली.

असा झाला भांडाफोड

सहायक सल्लागार नाठे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी करून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास भाड्यात सवलत मिळणेबाबत ओळखपत्र देण्याचे काम आहे. 2 मे 2018 रोजी चौघांनी त्यांचेकडे ओळखपत्र मिळणेबाबत अर्ज केला होता. प्रमाणपत्रावरील सही व हस्ताक्षर यामध्ये नाठे यांना तफावत दिसुन आली. त्यामुळे त्यांनी ते प्रमाणपत्र ठेवुन घेवुन त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालयास पत्रव्यवहार करुन ते प्रमाणपत्र दिले अगर कसे याबाबत माहिती विचारली होती. ते प्रमाणपत्र दिलेबाबत नोंद नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाकडून नाठे यांना कळविण्यात आले. यानंतर प्रमाणपत्राची बनावटगिरी उघड झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या