राहाता |प्रतिनिधी| Rahata
शिर्डी येथे गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग करणार्या टोळीतील 2 आरोपींना सराफासह ताब्यात घेतले. आरोपीकडून 3 लाख 20 हजार रुपये किमतीच्या सोन्यासह 4 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. फिर्यादी रामप्रसाद पुटुराव, रा. बेंगलोर, कनार्टक हे साईबाबा पालखी मिरवणुकीमध्ये शिर्डी येथे असताना अज्ञात आरोपीनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपास करण्याचा आदेश दिला.
त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसइ तुषार धाकराव, पोलीस अंमलदार विश्वास बेरड, बिरप्पा करमल, फुरकान शेख, अरुण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे, जालिंदर माने, रोहित येमुल, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, आकाश काळे यांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत पथकास रवाना केले. पथकाने गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा अविनाश कुसळकर, रा. गांधीनगर, बीड याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी खरवंडीकासार, ता. पाथर्डी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपी अविनाश अशोक कुसळकर, रा. तलवडा रोड, गांधीनगर, ता.जि.बीड यास ताब्यात घेतले. आरोपीस विचारपूस केली असता त्याने आदित्य बोरकर, रा. राहुरी याच्यासह रामनवमी दरम्यान शिर्डी परिसरातून गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागीने चोरी केल्याची माहिती सांगितली. आरोपी कुसळकर याच्याकडे विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने आपसात वाटून घेतल्याचे सांगृून त्याच्या वाट्यास आलेले सोन्याचे दागीने बीड येथील सोनार गौरव जोजारे यास विकल्याची माहिती दिली. त्यानुसार सोनार गौरव सुनील जोजारे, रा.चंपावतीनगर, बीड याने सोने विकत घेतल्याचे सांगितले.
पथकाने आरोपीने सांगितलेल्या माहितीवरून आदित्य दीपक बोरकर, रा. तनपुरे गल्ली, राहुरी यास ताब्यात घेतले. पथकाने आरोपीची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातून 3 लाख 20 हजार किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागीने हस्तगत केले. आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी रामनवमी दरम्यान शिर्डी येथे केलेल्या गुन्ह्यांच्या माहितीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी करून आरोपीकडून 2 जबरी चोरी व 2 चोरी असे एकूण 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले.