अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी परिसरात एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी (23 जून) रात्री 10.45 च्या सुमारास घडली. याप्रकरणी रेखा अशोककुमार पावा (वय 74 रा. मिस्कीन नगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा पावा या आपल्या पती व मुलीसह आशा हाउसिंग सोसायटी, मिस्कीन नगर, कृपाळ आश्रम जवळ राहतात. फिर्यादीत त्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या रोज रात्री जेवणानंतर घरासमोरील गल्लीत फेरफटका मारत असतात. सोमवारी रात्री 10.45 वाजता त्या त्यांच्या समोरील मुलीसोबत फिरत असताना त्यांच्या मागून दुचाकीवर एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 9 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 54 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात ओढून तोडले आणि गंगा उद्यानाच्या रस्त्याने तारकपुरच्या दिशेने पळून गेला.
चोरट्याने हेल्मेट परिधान केले होते व काळ्या रंगाचे जॅकेट आणि पाठीवर बॅग होती, त्यामुळे त्याची ओळख पटली नाही. ही घटना भर रस्त्यात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत.




