Tuesday, September 17, 2024
Homeक्राईममहिलेच्या गळ्याला चाकू लावून तीन तोळ्याची चेन ओरबाडली

महिलेच्या गळ्याला चाकू लावून तीन तोळ्याची चेन ओरबाडली

सोनसाखळी चोरट्यांची दहशत वाढली || स्टेशन रस्त्यावरील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

महिलेच्या गळ्याला चाकू लावून जखमी करून तीन तोळ्यांची सोन्याची चेन बळजबरीने चोरून नेल्याची घटना स्टेशन रस्त्यावरील आगरकर मळ्यात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा बाळाराम गुगळे (वय 64 रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, महिलेच्या गळ्याला चाकू लावून दागिने ओरबाडून नेल्याने सोनसाखळी चोरट्यांची नगरमध्ये चांगलीच दहशत वाढली असल्याचे समोर आले आहे. सुरेखा शनिवारी (3 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील कंपाउंडच्या गेटजवळ उभ्या होत्या.

तोंडाला मास्क बांधलेला एक अनोळखी इसम दुचाकीवरून त्यांच्या जवळ आला. त्याने सुरेखा यांच्या गळ्याला धारदार चाकू लावला व जखमी केले. त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने ओरबाडून दुचाकीवरून धूम ठोकली. जखमी सुरेखा यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महिला उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुरेखा यांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रविवारी (4 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत. दरम्यान, सोनसाखळी चोरट्यांनी नगरमध्ये धुमाकूळ घातला असून महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

केडगावातही दागिने चोरले
पायी फिरत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील तिघांनी ओरबाडून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी केडगाव उपनगरातील संदीपनगरमध्ये घडली. याप्रकरणी प्रतिभा प्रल्हाद साठे (वय 40 रा. मोतीबाग सोसायटी, संदीप हॉटेलसमोर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरासमोरच पायी फिरत असताना दुचाकीवरील आलेल्या तिघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्या एकाने गोफ चेन व सोन्याचे फूल असे 55 हजारांचे दागिने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या