अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नगर शहरासह उपनगरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री बालिकाश्रम रस्त्यावर एका महिला पोलीस अंमलदार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडण्याचा प्रयत्न केला असता या महिला पोलीस अंमलदार व त्यांच्या मैत्रिणींने पाठलाग करून दोघा चोरट्यांना पकडले.
मोहीनी ज्योतीराम कांबळे (वय 28 रा. पोलीस मुख्यालय, बालिकाश्रम रस्ता, नगर) असे त्या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद ऊर्फ जॉनी ऊर्फ वीर जिजाबा ऊर्फ ओवाळ्या भोसले (वय 19) व विशाल जिजाबा ऊर्फ ओवळ्या भोसले (वय 19 दोघे रा. चिखली ता. आष्टी, जि. बीड) अशी पकडलेल्या सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. फिर्यादी या त्यांची मैत्रिण निकीता बनकर व आश्विनी थोरात यांच्यासह किराणा खरेदीसाठी मंगळवारी रात्री पायी जात होत्या. त्या 7:50 वाजेच्या सुमारास निलक्रांती चौकात आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ओढणीसोबत सोन्याची चेन ओढली व धूम ठोकली. फिर्यादी यांच्या सदरचा प्रकार लक्ष्यात येताच त्यांनी मैत्रिणीसह त्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावरच पकडले.
सदरचा प्रकार पाहून परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पकडलेल्या दोघांच्या ताब्यातून फिर्यादी यांनी त्यांची एक तोळ्याची चेन ताब्यात घेतली. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
पकडलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांकडे तोफखाना पोलीस चौकशी करत आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नगर शहरात होत असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीकोनातून तपास करत आहेत. दरम्यान, सदरच्या चोरट्यांना पकडलेल्या महिला पोलीस अंमलदार कांबळे यांच्यासह त्यांच्या मैत्रिणींचे कौतुक होत आहे.