अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
धार्मिक परीक्षा बोर्डावरील आनंदधाम येथे दर्शन घेऊन परतणार्या महिलेचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळवले. मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौक येथे सदर महिला रिक्षाची वाट पाहत उभी असताना शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी वैशाली वसंत मुनोत (वय 55, रा. तापीदास गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली वसंत मुनोत या त्यांची नणंद छाया चंगेडे यांच्यासमवेत आनंदधाम येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर घरी परतण्यासाठी त्या महात्मा फुले चौकात राऊ हॉटेलजवळ रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी सहकार सभागृहाच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने वैशाली मुनोत यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र चोरटे कोठी रोडच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, मंगळसूत्र चोरीच्या घटना पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.