Monday, November 25, 2024
Homeब्लॉगनिजामशाही आणि आदिलशाहीची चांदबीबी

निजामशाही आणि आदिलशाहीची चांदबीबी

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात दक्षिणेत निर्माण झालेल्या बहामनी या मुस्लीम साम्राज्याची पाच शकले निर्माण झाली. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीदशाही. या राजवटींनी दक्षिण भारतात अनेक शतके आपला दबदबा कायम राखला होता. साम्राज्य विस्ताराचा, लढायांचा व एकमेकांवर कुरघोडी करण्याचा असा हा काळ होता. अशा काळात अहमदनगरच्या निजामशहाची कन्या आणि आदिलशहाची बेगम असलेल्या चांदबीबीने सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय आणि प्रत्यक्ष रणांगणावर आपली तलवार गाजवली. शत्रूनेही ‘चांद सुलतान’ हा किताब देऊन तिच्या शौर्याचा गौरव केला. राज्यांतर्गत कलहांना, षडयंत्राना पुरून उरणार्‍या चांदबीबीच्या कर्तबगारीची कमाल म्हणावी लागेल. चांदबीबी ही अहमदनगरचा निजामशहा बादशाह हुसेन निजामशहा याची कन्या. तिचा जन्म सन 1547 साली अहमदनगर येथे झाला. चांदबीबी लहानपणापासूनच हुशार आणि शूर होती. शस्त्र चालवणे, घोडेस्वारी करणे, शिकार करणे, दरबारात उपस्थित राहणे तिला आवडायचे.

दक्षिणेत विजयनगरच्या साम्राज्याच्या विरुद्ध बाहमनी राज्यापासून निर्माण झालेल्या पाच शाह्यांचे कायम शत्रूत्व होते. त्यांच्यात साम्राज्य विस्तारासाठी व स्वतःच्या वर्चस्वासाठी कायम लढाई सुरू असे. विजयनगरच्या विरुद्ध एकत्र येण्यासाठी या पाच शाह्या एकमेकांसोबत युती करत असत. याच युतीसाठी निजामशाह हुसेन याने आपली मुलगी चांदबीबी हिचा विवाह अली आदिलशहा याच्याबरोबर करून दिला. यावेळी विवाहात हुंडा म्हणून हुसेन निजामशहा याने जावई आदिलशहा यास सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला दिला. या किल्ल्याचा पुढे आदिलशाहीस खूप उपयोग झाला. आदिलशहा चांदबीबीच्या बुद्धिमत्तेवर व शौर्यावर मोहित होता. ज्यावेळी पती अली आदिलशहा राज्याची, सैन्याची पाहणी करण्यासाठी बाहेर पडत त्यावेळी ते चांदबीबीला सोबत घेत. इतकेच नाही तर मोहिमेवर जाताना आदिलशहा यांच्यासोबत राहून चांदबीबी आपल्या पतीला हरतर्‍हेची मदत करत असे. राज्यासंबंधी कुठलाही प्रश्न असेल तर आली आदिलशहा प्रथम चांदबीबीचा सल्ला घेत असे.

- Advertisement -

अशाप्रकारे सर्व अलबेल असताना 1580 साली एका सेवकाने घातपाताने आदिलशहाचा खून केला. आदिलशहा आणि चांदबीबीस पुत्र नसल्याने आदिलशहाचा पुतण्या इब्राहिम यास गादीवर बसवून चांदबीबी राज्यकारभार पाहू लागली. चांदबीबीला माणसाची पारख होती. राज्यकारभाराचे ज्ञान होते. आदिलशाहीतील योग्य व्यक्ती हेरून तिने राज्याच्या योग्य त्या जबाबदार्‍या त्याच्यावर सोपवल्या.आदिलशाहा असलेल्या इब्राहिमचे शिक्षण, राज्यातील सुधारणा, राज्याचे संरक्षण याकडे तिने कटाक्षाने लक्ष दिले. राज्याचे व्यवस्थापन तिने अतिशय चोख राखले होते. चांदबीबीचे आदिलशाहीवर नियंत्रण आणि उत्तरोत्तर तिची वाढणारी लोकप्रियता तिच्या काही सरदारांना खटकत होती. आदिलशाहीतील मुख्यमंत्री म्हणून कामिल खान हा हुशार उमराव काम पाहत होता. राणी चांदबीबीच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या मनात तिच्याविषयी मत्सर निर्माण झाला.

तो चांदबीबी विरुद्ध कारवाया करू लागला. हे लक्षात येताच तिने त्याची मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आणि किश्वरखान नावाच्या सरदाराकडे हे पद सोपवले; परंतु किश्वरखान यानेही चांदबीबीशी विश्वासघात करून राज्यातील काही सरदार फोडून राज्य स्वतःकडे घेण्याचा डाव रचला. सरदारांचा एक मोठा गट स्वतःकडे वळवून चांदबीबीस पदत्याग करायला सांगून विजापूर सोडून जाण्यास सांगितले. चांदबीबीने या राजद्रोहास प्रखर विरोध केला. परंतु बंडखोर सरदारांनी चांदबीबीला अटक करून राजवाड्याबाहेर काढले. विजापूरहून सातार्‍यास नेले व तेथील किल्ल्यात कैद केले. काहीकाळानंतर किश्वरखानाचा स्वार्थीपणा लक्षात आल्यावर त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांना आदिलशाही गादीशी आपण गद्दारी केल्याचा पश्चाताप झाला. त्यांनी चांदबीबीची कैदेतून सुटका केली. आपला कट फसला हे लक्षात येताच किश्वरखान विजापूरमधून फरार झाला व गोवळकोंड्यास आश्रयास गेला. परंतु चांदबीबीच्या सैन्याने त्याचा पाठलाग करून त्यास देहांताची शिक्षा दिली.

चांदबीबीने विजापूरचा कारभार पुन्हा हाती घेतला. इखलास खानकडे मुख्य प्रधानपदाची सूत्रे दिली. राज्यकारभार करताना चांदबीबी प्रांतातील जनतेला जास्त सवलती देते, आपल्याला विचारात न घेता प्रजेच्या हिताला महत्त्व देते याचा राग इखलास खानाला आला. त्याने तिच्याविरुद्ध कट केला. चांदबीबीचे समर्थक असलेले अफजलखान शिराझी आणि प्रधान राजू पंडित यांची त्याने हत्या केली. हे लक्षात येतात चांदबीबीने इखलास खानास अटक केली. दरबारातील अशा अंतर्गत कलहासमयी अत्यंत सक्षम, जागरुक राहून चांदबीबीने वेळोवेळी आदिलशाही सांभाळण्याचा प्रयत्न केला.

निजामशाही हे चांदबीबीचे माहेर आणि आदिलशाही सासर असल्याने या दोन्ही राज्यांबद्दल तिला आपुलकी व ओढ होती. ही दोन्ही राज्ये एक राहावीत, त्यात सुव्यवस्था नांदावी यासाठी चांदबीबीने अथक प्रयत्न केले. परंतु या दोन्ही राज्यांत दक्षिणेकडील लोक व हबशी म्हणजे सिद्धी लोक असे गट पडत असत आणि या दोन गटातील व्यक्तींमध्ये राज्यातील महत्त्वाच्या पदांवरून, संपत्तीवरून गट पडत असत, भांडणे होत असत.

याचाच परिणाम म्हणून अहमदनगरचा बादशहा इब्राहिम निजामशहाचा खून झाला. त्याच्या मृत्यूनंतर मिआन मंझू नावाच्या सरदाराने परवानगी न घेता अहमदशाह नावाच्या राजपुत्रास गादीवर बसवले. या गोष्टीने दुःखी होऊन चांदबीबी विजापूरला निघाली. विजापुरास जाऊन चांदबीबी आपल्यावर हल्ला करेल म्हणून मिआन मंझू याने गुजरातच्या मुरादची मदत मागितली. परंतु मुराद मुत्सद्दी होता. या संधीचा फायदा घेऊन संपूर्ण निजामशाहीचे राज्य हस्तगत करावे हा हेतू ठेवून तो निजामशाहीवर चालून आला. मुरादचा हेतू लक्षात येताच आपण पुरते फसल्याची जाणीव मिआन मंझूला झाली. चांदबीबीसमोर त्याने शरणागती पत्करून निजामशाही वाचवण्याची याचना केली. यावेळी चांदबीबीचे वय पन्नाशीच्या वर झाले होते. वयोमानानुसार तिची प्रकृती ठीक नसतानाही निजामशाहीच्या संरक्षणासाठी ती अहमदनगरकडे धावली. अनेक महिने तिने मुरादच्या सैन्याला रोखून धरले. स्वतः तलवार हाती घेऊन अहमदनगरचा किल्ला राखला. शत्रू असलेला गुजरातचा मुराद चांदबीबीचे शौर्य पाहून प्रभावित झाला. त्याने चांदबीबीस चांद सुलतान हा किताब देऊन तिचा गौरव केला.

चांदबीबी सासर व माहेरच्या दोन्ही शाह्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. पण अंतर्गत कलह वाढतच होते. या यादवीचा फायदा घेऊन दिल्लीतील प्रबळ सत्ताधारी अकबराने आपल्या सरदारांस निजामशाहीवर चालून जाण्यास सांगितले. मोगल सैन्याशी आपण मुकाबला करू शकत नाही हे ओळखून चांदबीबीने मुघल सरदारांशी तहाची बोलणी करावी, असा सल्ला निजामशाहीतील सरदारांनी दिला.परंतु चांदबीबीच्या या गुळगुळीत सल्ल्याने ती राज्याशी राजद्रोह करत आहे हे सगळीकडे सरदारांनी पसरवून एका बेसावध क्षणी त्यांनी चांदबीबीस अटक केली आणि तिला 1599 साली मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. यावेळी चांदबीबी 52 वर्षांची होती.आपल्या माहेरच्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी झटणार्‍या चांदबीबीची तिच्याच लोकांनी निर्घृणपणे हत्या केली. तिच्या हत्येनंतर मोगलांनी अहमदनगरवर हल्ला करून ते बेचिराख केले. निजामशाहीतील लोकांना आपली चूक समजली; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

अहमदनगर येथे चांदबीबीस जेथे दफन करण्यात आले ती जागा चांदबीबी महल म्हणून ओळखली जाते. चांदबीबी युद्धकलेत, राज्यकारभारात कुशल तर होतीच; परंतु तिचे आरबी, फारसी या भाषांबरोबर दक्षिणेतील भारतीय स्थानिक भाषांवरही प्रभुत्व होते. दूरदर्शी चांदबीबी भारताच्या इतिहासात आपल्या कार्यामुळे अजरामर झाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या