मुंबई । Mumbai
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. सुरुवातीपासूनच आंदोलकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मैदानात उसळलेली असून, काल रात्रीपासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणे कायदेशीर दृष्ट्या अशक्य असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी असूनही सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची टीका त्यांनी आंदोलकांवर केली.
पाटील म्हणाले की, “जरांगे पाटील यांचे आंदोलन हे प्रामुख्याने राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीच सुरू आहे. आज काही मागण्या मान्य झाल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नाहीत. समाजातील लाखो बांधवांना आता कुणबी दाखल्याचा फायदा मिळतो आहे. एका व्यक्तीला दाखला मिळाला की त्याचा फायदा त्याच्या कुटुंबातील अनेकांना होतो. त्यामुळे शासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे.”
यावेळी त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. “शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, पण त्यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही? हे केवळ वेळकाढूपणा आहे,” असे पाटील म्हणाले. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून ते टिकणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पितृसत्ताक पद्धतीनुसार सगेसोयऱ्यांना दाखले देण्याची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे लाखो समाजबांधवांना फायदा होईल, असे पाटील यांनी सांगितले. EWS आरक्षण हे खरेतर मराठा समाजासाठी आहे, असा दावा करताना त्यांनी “मराठे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. त्यांना कधीच दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही,” असे वादग्रस्त विधान केले.
या वक्तव्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे समाजातील तणाव वाढला असताना, पाटील यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारकडून ठोस भूमिका न घेतल्याने आणि कायदेशीर अडथळ्यांचा मुद्दा पुढे करून वेळ मारून नेली जात असल्याची भावना आंदोलकांमध्ये वाढत आहे. आता राज्य सरकारने या प्रश्नावर ठोस तोडगा काढला नाही, तर पुढील काही दिवसांत मराठा आरक्षणाचा लढा आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.




