Tuesday, February 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChandrapur Mayor Election: चंद्रपूरात ठाकरेंच्या शिवसेनेने केला काँग्रेसचा गेम; महापौरपदी भाजपच्या उमेदवार...

Chandrapur Mayor Election: चंद्रपूरात ठाकरेंच्या शिवसेनेने केला काँग्रेसचा गेम; महापौरपदी भाजपच्या उमेदवार एका मताने विजयी

विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार?

चंद्रपूर | Chandrapur

चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर आणि वडेट्टीवार वादाचा फटका काँग्रेसला (Congress) बसला आहे. आज (मंगळवारी) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली असता त्यात भाजपाच्या उमेदवाराचा (BJP Candidate) एका मताने विजय झाला आहे. ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ३४ नगरसेवकांची गरज होती. त्यासाठी काँग्रेसकडून ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलणी सुरु होती. परंतु, सन्मानजनक तोडगा न निघाल्याने ठाकरेंच्या सेनेतील स्थानिक नेत्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या मदतीने भाजपचा महापौर बसला आहे.

- Advertisement -

चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर (Sangita Khandekar) यांची निवड झाली आहे. खांडेकर यांना ३२ तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली. वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले तर एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिला. तर ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला मतदान केले. त्यामुळे चंद्रपूरात जास्त संख्याबळ असूनही काँग्रेसला सत्तास्थापन करता आली नाही. काही दिवसांपूर्वी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वाद दिल्ली दरबारी गेला होता. त्यावर तोडगाही निघाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्याने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकला आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Chandrapur Mayor Election : काँग्रेसला धानोरकर-वडेट्टीवार वादाचा फटका; ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने चंद्रपूरात भाजपचा महापौर होणार

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर (Sangita Khandekar) यांची निवड झाल्यानंतर उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेसच्या पप्पू देशमुख यांना ३२ आणि ठाकरे सेनेच्या प्रशांत दानव यांना ३२ अशी समसमान मते मिळाली. त्यामुळे आता उपमहापौर ईश्वरचीठ्ठीद्वारे निवडला जाणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या खांडेकर यांना ३२ तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय म्हणाले?

चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ठाकरे सेनेसोबत वंचितचेही दोन नगरसेवक भाजपसोबत जाणार असल्याची माझी प्राथमिक माहिती आहे. अंतर्गत गटबाजीचा आम्हाला फटका बसला हे निश्चित आहे, असं सपकाळ म्हणाले.

ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष गिऱ्हे काय म्हणाले?

याबाबत माहिती देतांना चंद्रपूरचे ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी सांगितले की, काँग्रेससोबत बोलणी अयशस्वी झाल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. तर भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी पहिले सव्वा वर्ष चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर बसेल. तर ठाकरे सेनेचा उपमहापौर असणार आहे. तसेच स्थायी समितीचे पद शिवसेना उबाठाला देण्यात येईल. यानंतर पुढील सव्वा वर्ष ठाकरे सेनेचा महापौर होईल, असेही त्यांनी म्हटले.

चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा -६६

काँग्रेस -२७
काँग्रेस समर्थित जनविकास आघाडी – ०३
भाजप – २३
शिंदेंसेना – ०१
शिवसेना उबाठा -०६
वंचित -२
बसपा -१
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) -२
एमआयएम -१

ताज्या बातम्या

सुनेत्रा

DCM Sunetra Pawar: परंपरेचा पुढचा अध्याय, भावनिक क्षणी, सुनेत्रा अजित पवारांनी...

0
मुंबई | Mumbaiदिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आज पदभार स्वीकारला आहे....