Saturday, May 2, 2026
HomeराजकीयRohit Pawar : अजितदादांच्या विमान अपघातावर होणार मोठा गौप्यस्फोट? रोहित पवारांच्या पोस्टमुळे...

Rohit Pawar : अजितदादांच्या विमान अपघातावर होणार मोठा गौप्यस्फोट? रोहित पवारांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या प्रकरणाला एक अत्यंत महत्त्वाचे आणि खळबळजनक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अपघाताबाबत जनसामान्यांसह पवार कुटुंबाच्या मनातही अनेक शंका असल्याचे समोर येत असतानाच, आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही महत्त्वाची पत्रकार परिषद आज मंगळवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडणार आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली असून, “बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.” असे त्यांनी नमूद केले आहे.

२८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास अजित पवार यांचे खाजगी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आणि त्याला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत अजितदादांसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताच्या वेळी हवामान स्वच्छ असतानाही विमान नेमके कसे कोसळले, याबाबत आता तांत्रिक शंका उपस्थित केल्या जात आहेत. रोहित पवार या पत्रकार परिषदेत विमानाचा तांत्रिक घटनाक्रम, हवामान अहवाल आणि उड्डाणापूर्वीच्या काही संशयास्पद हालचालींवर भाष्य करण्याची शक्यता आहे.

यापूर्वी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या विमानात स्फोट झाल्याचा किंवा बॉम्ब ठेवल्याचा संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता रोहित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अपघात केवळ तांत्रिक चूक होती की त्यामागे काही राजकीय षडयंत्र होते, यावर ते काय बोलणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. यावर भाष्य करताना रोहित पवारांनी यापूर्वीच सांगितले होते की, विलीनीकरणाबाबत आणि पक्षाच्या भविष्याबाबत अजितदादांची नेमकी काय इच्छा होती, हे ते १२ फेब्रुवारीला स्पष्ट करतील. मात्र, त्याआधी आज होणाऱ्या विमान अपघाताच्या खुलाशामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Board HSC Result 2026 : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाची...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (दि.०२) रोजी पत्रकार परिषद घेत बारावी परीक्षेचा (HSC Result) निकाल जाहीर करण्यात...