चंद्रपूर | Chandrapaur
काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवार वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज (मंगळवारी) निवडणूक (Chandrapur Mayor Election 2026) होत आहे. ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत बहुमताचा आकडा ३४ असून, निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशातच किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शिवसेना उबाठाने काँग्रेसला धक्का देत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु होती. दोन्ही पक्षांकडून महापौरपद मिळावे यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरु होती. ठाकरे सेनेने आपल्याला महापौरपद मिळावे याकरिता काँग्रेसकडे अट घातली होती. दुसरीकडे भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी सव्वा-सव्वा वर्षे महापौरपदाची ऑफर दिली होती. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ही ऑफर स्वीकारत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सुरुवातीच्या सव्वा वर्षे भाजपचा महापौर चंद्रपूर महापालिकेत बसणार आहे.
याबाबत माहिती देतांना ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी सांगितले की, काँग्रेससोबत बोलणी अयशस्वी झाल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. तर भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी पहिले सव्वा वर्ष चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर बसेल. तर ठाकरे सेनेचा उपमहापौर असणार आहे. तसेच स्थायी समितीचे पद शिवसेना उबाठाला देण्यात येईल. यानंतर पुढील सव्वा वर्ष ठाकरे सेनेचा महापौर होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रपूर महापालिकेचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून, थोड्याच वेळात नवीन महापौरांची निवड होणार आहे. त्यामुळे आता भाजपकडून महापौरपदासाठी कुणाला संधी दिली जाते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला महापौरपदाचा घास भाजपने हिरावल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल
एकूण जागा -६६
काँग्रेस -२७
काँग्रेस समर्थित जनविकास आघाडी – ०३
भाजप – २३
शिंदेंसेना – ०१
शिवसेना उबाठा -०६
वंचित -२
बसपा -१
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) -२
एमआयएम -१





