मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अडचणीत सापडले आहेत. तर मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या घटनांमुळे विरोधकांकडून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील पुन्हा एकदा आक्रमक होत आरोपांना तोंड देणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळामध्ये असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास नैतिक जबाबदारी म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते, असे म्हटले होते. त्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बावनकुळे म्हणाले की,”अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेईल आणि त्यावर निर्णय करतील,असे स्पष्ट केले. तसेच महायुती सरकारच्या पुढाकाराने २० लक्ष घर मंजूर झाली आहेत. या २० लाख घरांचे आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल. याशिवाय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतली,असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत का? असे विचारले असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. एकनाथ शिंदे प्रगल्भ आणि महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत. एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करत असून त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केलं आहे. हिंदुत्वाचा वसा घेऊन एकनाथ शिंदे काम करत असून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत,असेही बावनकुळे यांनी म्हटले. .