मुंबई । प्रतिनिधी Mumbai
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात ४४ गावांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत टंचाई परिस्थितीत योजनेतून एकूण ६० गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. योजनेच्या माध्यमातून एकूण ६० गावांची पाणी मागणी ९.४५ दश लक्ष लिटर एवढी आहे. या योजनेद्वारे उपलब्ध होणारे पाणी आणि गळती याबाबत महिनाभरात पाण्याचे ऑडिट करण्यात येईल, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी वरील माहिती दिली. योजनेतील पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित योजनेचे काम सुरू आहे. योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. योजनेतील पाईप लाईनवर अनधिकृत, परवानगीपेक्षा जास्त जोडण्याची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.