Monday, November 25, 2024
Homeनगरअचूक नियोजनामुळे चांगदेवनगर ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

अचूक नियोजनामुळे चांगदेवनगर ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा परिसरातील चांगदेवनगर परिसराला महत्त्वाचे स्थान आहे. येथील ग्रामस्थांच्या अचूक व धोरणात्मक निर्णयामुळे त्यांनी पिण्याच्या पाणीटंचाईवर मात केलेली आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून माजी आमदार जगन्नाथ पाटील बारहाते यांनी चांगदेवनगर येथे 1953-54 च्या दरम्यान चांगदेवनगर येथे सार्वजनिक विहीर खोदली. अंदाजे 47 फूट खोल असलेल्या ह्या विहिरीला आजही मुबलक पाणी आहे. चांगदेवनगर येथे 1941 मध्ये खाजगी क्षेत्रातील अंदाजे 250 टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला साखर कारखाना चांगदेवनगर येथे सुरू करण्यात आला होता. योगीराज चांगदेव महाराज यांची गोदावरी नदीच्या काठी समाधी स्थान आहे. योगीराजांच्या नावावरून कारखान्याला चांगदेव कारखाना प्रा. लिमिटेड असे नाव देण्यात आले होते.

- Advertisement -

कारखान्याच्या निमित्ताने कामगारांची जी वसाहत बसली होती त्यास चांगदेवनगर असे नाव देण्यात आले होते. तात्कालिक परिस्थितीत गोदावरी उजवा कालवा व त्याच्या पोटचार्‍यामुळे या परिसरात मुबलक पाणी होते. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती होती त्यामुळेच चांगदेवनगर येथे साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिलिंग कायदा व इतर काही कारणामुळेच चांगदेवनगरजवळ महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचा चांगदेवनगर ऊस मळयाची 25 जुलै 1963 रोजी स्थापना करण्यात आली होती. गोदावरी उजव्या कालव्याच्या 18 चारी जवळ कामगारांची वसाहत बसली होती. म्हणून तिला 18 वाडी असे नाव पडले. चांगदेव कारखाना व शेती महामंडळाचा चांगदेवनगर मळा यामुळे परिसरात अंदाजे 100 पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला होता व परिसराला वैभवाचे दिवस प्राप्त झाले होते. परिसरातील 18 व 19 चार्‍यांना साधारणतः 20 ते 25 दिवसांच्या अंतराने मुबलक पाटपाणी येत असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत नव्हती तरी सुद्धा सिंचनासाठी शेतकरी वर्गाने विहिरी खोदल्या होत्या.

या विहिरींना उन्हाळ्यात सुध्दा मुबलक पाणी राहत होते. 1938 मध्ये स्थापन झालेल्या पुणतांबा ग्रामपंचायतीची पहिली सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली.त्यामुळे चांगदेवनगर येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून माजी आमदार जगन्नाथ पाटील बारहाते यांनी चांगदेवनगर येथे 1953-54 च्या दरम्यान चांगदेवनगर येथे सार्वजनिक विहीर खोदली अशी माहिती माजी सरपंच अ‍ॅड. मुरलीधर थोरात यांनी दिली. कारण ग्रामपंचायतीची अनेक वर्षे सत्ता कै. बारहाते यांच्या गटाकडे होती. अंदाजे 47 फूट खोल असलेल्या या विहिरीला मुबलक पाणी होते कारण विहिरीच्या पूर्व बाजूला काही अंतरावर 19 चारी व पश्चिम बाजूला अगदी 50 फुटावर चारी नंबर 18 वाहत होती. या विहिरीतून ग्रामस्थांना पाणी सहज घेता यावे म्हणून लोखंडी रहाट लावलेले होते. तसेच चांगदेव कारखान्याचे तात्कालिक कार्यालयीन अधीक्षक बाबूजी सक्सेना यांनी लोखंडी पाण्याची टाकी कारखान्यामार्फत बांधून दिली होती.

1975 – 76 ह्या काळात परिसरात वीज आली तेव्हा ह्या विहिरीवर पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युतपंप बसविण्यात आला होता. विहिरीमुळे चांगदेवनगर रोडवरील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय झाली होती. चांगदेवनगररोडवरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी फारशी भटकंती करावी लागली नाही. 1984 मध्ये चांगदेवनगर कारखाना बंद पडला. 2008-09 मध्ये शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्यावरील जमिनीची मशागत बंद झाली. मोठ्या प्रमाणात खंडकरी शेतकर्‍यांना खंडाच्या जमिनी परत करण्यात आल्या. पाटपाणी कमी झाले. 95 टक्के कामगारांनी स्थलांतर केले. जे काही ग्रामस्थ चांगदेवनगर रोडवर राहत होते त्यांची सुध्दा पाण्याची तृष्णा ह्या विहिरीने पूर्ण केलेली आहे. सध्या 18 चारी चांगदेवनगर जवळ अनेक वर्षांपासून बंद झाली आहे तर 19 चारीलाही पुरेसे पाटपाणी येत नसले तरी या विहिरीला आजही ग्रामस्थांची गरज भागेल एवढे पाणी उपलब्ध आहे, अशी माहिती दादासाहेब सांबारे यांनी दिली.

विशेष म्हणजे 1984 ला ग्रामपंचायतीची पहिली पाणी पुरवठा योजना सुरू झाली. त्यानंतर 2018 व 2023 मध्ये दोन पाणीपुरवठा होऊनही चांगदेवनगर ग्रामस्थांना आजही पाणीपुरवठा योजनेचे नियमित मुबलक पाणी मिळत नाही. मात्र चांगदेवनगर रोडवरील नागरिकांना या 70 वर्षांपूर्वीच्या विहिरीमुळे पिण्यासाठी आजही पुरेसे पाणी मिळत आहे. पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही हे वास्तव आहे. मात्र या विहिरीला सध्या विद्युतपंप बसविला नाही. नागरिकांना बादलीने ओढून पाणी न्यावे लागते. त्यामुळे नागारिक आवश्यक तेवढेच पाणी नेतात. त्यामुळे विहीर कधीही कोरडी होत नाही. 70 वर्षांपूर्वीची ही विहीर पिण्याच्या पाण्यासाठी चांगदेवनगर रोडवरील नागारिकांना वरदान ठरलेली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या