अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्याकडे निघालेला तरुण रस्त्यात एका हॉटेलमध्ये दारू पिण्यास थांबला. तेथील कामगारासोबत एकत्रित दारू पिऊन नशेत त्यालाच शिवी दिली. त्या कामगाराला राग आल्याने त्याने तरुणाचा रूमालाने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी चास (ता. नगर) शिवारात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा 15 दिवसांत उकल करत संशयित आरोपी कामगाराला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ताब्यात घेत अटक केली.
खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर (वय 22, मूळ रा. बिजमाई, ता. जि. आग्रा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने सुनील बाबुराव काळे (रा. कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर) या तरुणाचा खून केला असल्याची कबुली दिली आहे. 17 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात हॉटेल स्वामी समर्थजवळ, भोयरे पठारकडे जाणार्या रस्त्यावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीत मृताची गळा आवळून हत्या करून मृतदेह टाकून दिल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत तरुणाची ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरकान शेख, विश्वास बेरड, सागर ससाणे, रोहित यमुल, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरुण मोरे आदींचा समावेश होता. तपास पथकाने घटनास्थळाजवळील 40 ते 50 हॉटेल व ढाब्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, मृतदेह आढळला त्या ठिकाणाहून चार किलोमीटर अंतरावर एक बेवारस दुचाकी आढळली. वाहनाच्या तपासणीतून सुनील बाबुराव काळे असे मृताचे नाव निष्पन्न झाले.
पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर ते चास आणि चास ते सुपा टोलनाका दरम्यानच्या 171 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यातून मयत सुनील बाबुराव काळे हॉटेल साई दरबार येथे थांबल्याचे आढळले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर (रा. बिजमाई, आग्रा, उत्तर प्रदेश) याला संशयित म्हणून शोधले. 2 मार्च 2025 रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जाऊन नाईठाकूर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
नशेत शिवीगाळ केल्याने वाद
17 फेब्रुवारी रोजी मयत सुनील बाबुराव काळे हा हॉटेल साई दरबार येथे दारू पिण्यासाठी थांबला. तेथील कामगार संशयित आरोपी खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर याच्यासोबत त्याने मद्यपान केले. काळेने नाईठाकूर याच्याकडे राहण्यासाठी खोलीबाबत विचारणा केली. नाईठाकूर त्याला रूम दाखवण्यासाठी घेऊन जात असताना, काळे याने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या नाईठाकूर याने रूमालाने काळेचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली.