दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
मागील लेखात आपण प्रथमेशच्या आजीने लिहिलेल्या आवडींविषयी जाणून घेतले तरीदेखील तुमच्या मनात अजूनही शंका आहे. तुमची शंका ही खरीच आहे. औषधनिर्माणशास्त्रात करिअर म्हणजे फक्त औषधाच्या गोळ्या किंवा इतर औषधे तयार करणार्या कंपनीत नोकरी करणे असेच वाटते; परंतु औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच रसायनशास्त्रातील एक शाखा होय. रसायनशास्त्रातील अशा अनेक शाखा आहेत. म्हणजेच अनेक प्रकारची क्षेत्रे तुमच्यासाठी खुली आहेत. त्यात संशोधन करून तुम्ही पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायांबरोबरच स्वतःची कंपनी किंवा टेस्टिंग लॅब सुरू करून स्वतःची एक वेगळी वाट चोखाळू शकतात.
विद्यार्थी मित्रांनो, बेळगावहून जेमतेम आर्थिक परिस्थितीवर मात करून अमेरिकेच्या संसदेत स्थान मिळवणारे पहिले मराठी खासदार श्री. ठाणेदार यांनी केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्रात पदवी मिळवून ते संशोधनासाठी अमेरिकेत कसे गेले? हा त्यांचा प्रवास सर्वांनाच अचंबित करणारा आहे. रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयाचा उपयोग किती विविध क्षेत्रात होत असतो हे समजण्यासाठी श्री. ठाणेदार यांच्या जीवनातील एक घटना पाहिल्यावर तुमच्या सहज लक्षात येईल. तुम्हा मुला-मुलींना गाड्यांचे फार वेड असते. या तुमच्या वेडाचा केमिस्ट्रीशी म्हणजेच रसायनशास्त्राशी कसा संबंध आहे ते आपण पाहूया.
फोर्ड कंपनीच्या गाड्या तुम्हाला ठाऊक असतीलच, तर या फोर्ड कंपनीच्या गाड्यांच्या बंपर्स बनवण्याचे कॉन्ट्रॅक्टस् टेनेसीमधील एका कंपनीला देण्यात आले होते. बंपर्स बनवणारा मालक नियमितपणे फोर्ड कंपनीला बंपर्स विकत होता; परंतु अचानक एके दिवशी फोर्ड कंपनीने बंपर्स बनवणार्या कंपनीला नापास (रिजेक्ट) असा शेरा मारून बंपर्स परत पाठवले. बंपर्सवर जेव्हा स्प्रे पेंटिंग केले जाते तेव्हा बंपर्सवर रंग चिकटत नव्हता. बंपर्सवरचा रंग निघून येत होता. बंपर्स बनवणार्या कंपनीच्या मालकाचे धाबे दणाणले. या मालकाला कोणीतरी सांगितले की, सेंट लुईसमधली ‘केमिर’ नावाची कंपनी बंपर्समध्ये असलेला प्रॉब्लेम शोधून काढेल, तेव्हा तो उद्योजक ठाणेदार सरांकडे आला आणि त्याची अडचण सांगितली. श्री. ठाणेदार यांनी रिजेक्ट झालेले बंपर्स मागवून घेतले आणि प्रयोग सुरू केलेत. इन्फ्रा रेड स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला आणि बंपर्सवर रंग का चढत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले. प्लॅस्टिकचे बंपर्स बनवण्यासाठी दोन प्रकारची पॉलिमर्स एकत्र केली जायची. ठरावीक तापमानापर्यंत ही पॉलिमर्स गरम करून वितळवायचे, ती एकत्र केली की रिअँक्शन व्हायची आणि बंपरसाठी योग्य असे भक्कम कडक प्लॅस्टिक तयार व्हायचे.
रिजेक्ट झालेल्या बंपर्सच्या तपासात ठाणेदारांनी शोधून काढले की, या बंपर्समध्ये ही दोन पॉलिमर्स पाहिजे तितकी वितळली नव्हती, त्यामुळे रिअँक्शन नीट झाली नव्हती आणि ती नीट एकत्र मिसळली नव्हती. त्याचाच परिणाम तयार झालेले प्लॅस्टिक काहीसे हलक्या प्रतीचे होते म्हणून त्यावर रंग नीट बसत नव्हता. आता समस्या कळली, पण ती का उद्भवली हे शोधून काढणे महत्त्वाचे होते. परत प्रयोग केले तेव्हा समस्येचे मूळ कारण समजले. बंपर्स बनवायच्या कारखान्यातले तापमान मोजणारे यंत्र नीट काम करत नव्हते. योग्य ते तापमान तयार होण्याआधीच हे यंत्र जास्त तापमान दाखवायचे, त्यामुळे प्रत्यक्षात कमी तापमान असताना मिश्रण केले जायचे आणि संपूर्ण उत्पादनाचा तोल बिघडायचा. या दोषी तापमान यंत्राची दुरुस्ती करून ते ठीक करण्यात आल्यावर बंपर्सची कॉलिटी परत पहिल्यासारखी झाली आणि फोर्ड कंपनीनेही त्याबाबत समाधान व्यक्त केले. बंपर्सचा कारखाना परत एकदा सुरू झाला आणि उद्योजकही कमालीचा खूश झाला.
विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री या विषयात रुची असणार्यांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. श्री. ठाणेदार यांनी ज्याप्रमाणे आलेल्या प्रत्येक संधीचे सोने केले त्याप्रमाणे तुम्हीही तुमची आवड ओळखून आलेल्या संधीचे सोने करावे. त्यासाठीच हा लेखरूपी पत्रप्रपंच! विद्यार्थी मित्रांनो, या सुट्टीत ‘ही श्रींची इच्छा’ हे श्री. ठाणेदार यांचे पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचा. तुम्हालाही त्यातून प्रेरणा मिळेल. चला तर मग मुलांनो, सुट्टीचा उपयोग तुमच्यातील आवडी शोधण्याकरता करा आणि भविष्याची वाटही सुकर करा. पुन्हा भेटू प्रथमेशच्या नवीन आवडीसह तोपर्यंत धम्माल करा.