मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र,या बैठकीवर महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यावरून मविआच्या नेत्यांवर सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर आज यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.
हे देखील वाचा : आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ महायुतीवर पडणार भारी
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “राज्यातील ओबीसी समाजाच्या (OBC Community) आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना बैठकीला येण्याची विंनती केली. तसेच जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांना (Sharad Pawar) घेऊन यावे अशी विनंती केली होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी त्या बैठकीला येणे अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचा तरी फोन आला आणि सर्व विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला”,असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर
पुढे ते म्हणाले की, “तुमचा राग अजित पवार (Ajit Pawar) छगन भुजबळ यांच्यावर असेल पण हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही? बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मतं दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाहीत? एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या प्रश्नी मार्ग काढायचे सोडून शरद पवार हे विरोधी पक्षांना काहीतरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटवण्याचे काम करत आहेत, असा आरोप यावेळी छगन भुजबळांनी केला. तसेच निवडणुकीच्या वेळेस तुम्ही तुमचे झेंडे घ्या,आम्ही आमचे घेऊ.पण अशा मुद्द्यांवर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडणे बरोबर नाही, असेही भुजबळ यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा