मुंबई | Mumbai
मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत कोणती चर्चा झाली, यावर भुजबळांनी थेटच भाष्य केले.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, आज मी आणि समीर भुजबळ दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची चर्चा झाली. सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चा झाली. मागील काही दिवसात काय-काय घडले? आता काय सुरू आहे याबाबत बोलणे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलेय की, यावेळेस आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले. ओबीसींनी यावेळेस महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे,असे त्यांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, ओबीसींचे नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आठ दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाले, असे छगन भुजबळांनी म्हटले.
आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास छगन भुजबळ हे सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ यांच्या जवळपास २० ते ३० मिनिटे चर्चा झाली. भुजबळांनी भेट कोणत्या कारणांसाठी घेतली, यावर तर्क वितर्क सुरू आहेत.