मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि आमदार छगन भुजबळांचा महायुती मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी काही वेळापूर्वी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचे नाव नसल्याने ते नाराज झाले होते. तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर आणि अबोला राखून होते. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले मंत्रिपद त्यांना दिले जात आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचे नाव नसल्याने ते नाराज झाले होते. यावेळी त्यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावरही जाहीर टीका केली होती. जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना हा छगन भुजबळांचा डायलॉगही त्यावेळी चांगलाच गाजला होता. त्यानंतर नाराज असलेल्या छगन भुजबळांना अजित पवारांकडून मंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, “ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले,” असे सूचक विधान केले. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सर्वांचे आभार मानले.
या सर्वांपलीकडे, खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रिपद न मिळाल्याबाबत अधुनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल, ही आशा सोडून दिली होती. मात्र, सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले. शपथ घेण्यापूर्वी राजभवनात जाताना नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सर्व ८ दिवसांपूर्वीच ठरले होते, मंगळवारी सर्व मंत्री उपस्थित असतात म्हणून मंत्रिपदाची शपथ ही मंगळवारी (२० मे) घेण्याचे ठरले आहे. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, छगन भुजबळ यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
सात दिवसांपूर्वीच कळवला होता निरोप
मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची माहिती समोर आल्यानंतर पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या, नेमके काय घडामोडी घडल्या, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबत चर्चा व निर्णय झाला. खुद्द छगन भुजबळ यांनी आपल्याला केवळ एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. मला एवढेच सांगण्यात आले की, राज्य मंत्रिमंडळात माझी वर्णी लागत आहे. मंत्रिपदाचा शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा