मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज (मंगळवारी)कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पन्नास मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, “शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे. १९९१ पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री (CM) देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही,” असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवल्यासह (Yeola) विविध तालुक्यांत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि इतरांशी बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, ते बघू. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे, असे मला वाटते. त्यासाठी मी प्रयत्न करेन”, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.





