नाशिक | Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे ते नागपुरात सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून सोमवारी रात्री नाशिकमध्ये परतले.कालपासून भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरु होत्या. त्यानंतर आज नाशिकमधील जेजुरकर लॉन्स येथे राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून छगन भुजबळांनी आपली पुढील वाटचाल कशी असेल, हे स्पष्ट केले.
यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “मी सर्वाचे आभार मानतो की कमी वेळात तुम्ही सर्व आलात. माजी आमदार आणि भविष्यातील आमचे आमदार आलेत. लोकांची मन खिन्न आहेत काल पासून मी हे बघत आहे. कोणीतरी गेल्या सारखी अवस्था आहे. लोकांना धक्का बसला आहे, कोणी त्यातून बाहेर येत नाही. ही गोष्ट येवला, लासलगाव पूर्ती नाही तर संपूर्ण राज्यात आहे. संपूर्ण देशातून फोन येत आहेत. सर्वाची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात, राज्यात या, लोक पेटून उठत आहेत. मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही. तुम्ही निषेध करा, पण जोडे मारो, शिव्या नको. रोज सकाळी ८ वाजता काय चालू आहे, त्याची सगळी माहिती मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना होत आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे भुजबळ यांनी लोकसभेपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काय काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय काय झालं ते सर्वांना माहीत आहे.मोदी आणि शाह यांनी प्रत्येक मतदारसंघ कुणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा झाली. नाशिक भुजबळांना द्यायचे असे मोदी म्हणाले. शिंदे म्हणाले, आमचा सिटिंग उमेदवार आहे. मोदी म्हणाले, नाही, त्यांना माझ्याकडे पाठवा. मी त्या उमेदवाराला समजावतो. आम्हाला पटेल यांच्या घरी बोलावलं. त्यांनी मोदींचा निरोप दिला. मी म्हटलं मी काही उमेदवारी मागितली नाही. ते म्हणाले, तुम्हीच उभे राहा. मी २४ तास विचार करायला घेतले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलो नाही राहणार. तर ते म्हणाले, तुम्हाला उभं राहावं लागेल. नसेल तर दिल्लीला जाऊन सांगा. मग मी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार झालो. त्यानंतर नाशिकला आलो. कार्यकर्ते म्हणाले, तुम्ही उभे राहा, एक आठवडा गेला माझं नाव कोणीच नाही घेतले. दुसरा गेला, तिसरा आठवडा झाला. दोन चार नावंच जाहीर व्हायचे राहिले. मी किती थांबायचे. त्यांनी सांगितले म्हणून वाट पाहिली. त्यानंतर मी स्वत:हून जाहीर केले की मी निवडणूक लढणार नाही. त्यावेळी कोणी काही बोलले नाही. १० दिवसांनी सांगितले भुजबळांनी घाई केली. मी घाई केली ठीक आहे. पण तुम्ही घाई करायची ना, माझं नाव आधीच जाहीर करायचं ना”, असे भुजबळांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला माझा कधीच विरोध नाही
जसे दलित,मागासवर्गीय, ओबीसी माझ्या सोबत आहेत, तसे मराठा समाजातील नागरीकही सोबत आहेत. मराठा समाजातील लोकांनीही निवडणुकीत माझं काम केलं. आपले सगळेच शत्रू नाहीत. आम्हाला संपवण्यासाठी निघालेल्यांना आमचा विरोध आहे. आरक्षण मिळाल्यावर सगळंच बदलतं असं नाही. मागासवर्गीय लोकांना आरक्षण दिले तर हळूहळू वर येतील अशी भावना त्यावेळी होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी कधीच विरोध केला नाही.विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आला, तेव्हा पहिला हात मी वर केला. पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. ईडब्लूएसच्या १० टक्के आरक्षणात एकट्या मराठा समाजाला साडे आठ टक्के आरक्षण मिळत होते. आमच्यावर कुरघोडी करण्याचे जे प्रयत्न करत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. आता पुन्हा एकदा जाळपोळ होता कामा नये. तेव्हा लोक काय? नेते देखील घाबरलेले होते. आम्ही तेव्हा कोणाच्या विरोधात बोललो, ते मला सांगा. तेव्हा काही मेळावा झाले, त्यामुळे सगळ्यांना धीर मिळाला, असेही त्यांनी म्हटले.
जरांगेवर अप्रत्यक्षपणे टीका
छगन भुजबळ पुढे म्हणाले, निवडणुकीला आपण उभे राहिलो, अनेक लोक विधानसभेला उभे राहिले. आपले तर दोन-दोन लोकही उभे होते. अशा गोष्टी राजकारणात होत नाहीत. तुम्हाला निवडून यायचं असेल तर मजबूत काम पाहिजे. सगळ्या लोकांचा पाठिंबा पाहिजे, एखाद्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा असेल तर अधिक चांगलं असतं. राजकारणात अजूनही आपली माणसं कच्ची दिसत आहेत. जे निवडून येतात ती आपली माणसं एक शब्दही बोलत नाही. त्यांचं काही चुकतं आहे असं मी समजणार नाही. माझ्याही मतदारसंघात एक महाशय सलाईन लावून आले. त्यांनी १० वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या. त्यांच्या मात्र दोन वाजेपर्यंत सुरू होत्या.माझं काय होणार मला माहीत नाही या माणसाला म्हणजे मला पाडा असं त्याने सांगितलं. त्यामुळे माझी ६० ते ७० हजार मतं कमी झाली. हिंदू-मुस्लिम या सगळ्यांची मतं कमी झाली. दलित समाज, ओबीसी समाज, गुजराती समाज सगळे समाज एकजुटीने एकत्र आले आणि मला निवडून दिले, असे त्यांनी म्हटले.
मला मंत्रिपदाची हाव नाही
आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला २०२४ ला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. “कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”. असा शेरही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटला.
पुन्हा ओबीसींचा एल्गार पुकारणार
आता महापालिका,जिल्हापरिषदेच्या निवडणुका आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेमुळे आमदार म्हणून निवडून आलो नाही. लाडक्या बहिणीमुळे आमदार निवडून आले, असं अनेकांना भ्रम झाला आहे. मात्र इतर गोष्टी देखील आहेत. आता आम्ही रस्त्यावर लढाई घेऊन जाऊ. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी आता पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेले मैदान पाहिलं आहे, पाऊस आला तरी कोणी उठले नाहीत. पाटणा, बिहार येथे सात लाख लोकांचं मैदान आहे. जयप्रकाश नारायण यांचं तिथे भाषण फुल्ल झालं होतं. त्यानंतर महात्मा समता परिषदेच्या सभेला पूर्ण मैदान भरलं होतं. लालूजी पाहत बसले, काय सभा आहे. अनेक ठिकणी सभा झाल्या. थोडं शांत राहा, आपल्याला पुढे जाऊन आपली ताकद एकत्र करावी लागेल, असेहीछगन भुजबळ म्हणाले.